द्राक्षपंढरीत छाटणीचा हंगाम 20 दिवसांनी लांबला; पावसाच्या सातत्याचा परिणाम

Grapes News
Grapes Newsesakal

नाशिक : द्राक्षपंढरीत आतापर्यंत ११६.७ टक्के पाऊस झाला असून वरुणराजाची हजेरी कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठीची छाटणी २० दिवसांनी लांबली आहे. बागांमधील पानगळीसाठी फवारणी केल्यावर १२ ते १५ दिवसांनी छाटणी सुरु केली जाते. पण तशी संधी आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पावसाचे पाणी बागेत साठून राहत आहे. (Pruning season extended by 20 days in grape city nashik due to Continuous rain Nashik Latest Marathi News)

जिल्ह्यात द्राक्षबागांचे क्षेत्र पावणेदोन लाख एकर, तर राज्यात साडेचार लाख एकरांपर्यंत आहे. सर्वसाधारपणे जुलै ते ऑगस्टमध्ये कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या पट्यातील द्राक्षांच्या ‘अर्ली’ उत्पादनासाठी छाटणी चालते. यंदा ही छाटणी १० सप्टेंबरपर्यंत चालली होती. ‘अर्ली’ छाटणीचे क्षेत्र आता बाराशे एकरांपर्यंत उरलेले आहे. जिल्ह्याच्या उरलेल्या भागात ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बागांची ऑक्टोंबर छाटणी होत असते.

पुण्याच्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५ ते १० टक्क्यांपर्यंत छाटणी झाली आहे. एकीकडे छाटण्यांना वेग येण्याचा प्रश्‍न तयार झालेला असताना द्राक्षांच्या निर्यातीसाठी मागील हंगाम संपताना बांगलादेशच्या किलोला १५ ते २० रुपयांनी वाढलेल्या आयात शुल्काच्या प्रश्‍नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

शेतकऱ्यांच्या माहितीनुसार युरोपच्या तुलनेत बांगलादेशमध्ये दीडपट ते दुप्पट अधिकची द्राक्षे विक्रीसाठी जातात. याशिवाय निर्यातीवर देण्यात येणारे केंद्र सरकारचे कमी झालेले अनुदान आणि भाड्याचे मिळत नसलेले अनुदान हे दोन्ही प्रश्‍न द्राक्ष उत्पादकांच्यादृष्टीने कळीचे मुद्दे झाले आहेत.

Grapes News
Mumbai- Agra Highway उजळणार 924 पथदिपांनी; 9 कोटींचा निधी

उत्पादन खर्चात ४० टक्क्यांनी वाढ

मजुरीसह खते, औषधांच्या भावात वाढ झाल्याने यंदा उत्पादन खर्चात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंबंधी द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून आमदार आणि खासदारांची वैयक्तिक भेट घेऊन एकत्रित बैठक घेतली जाणार आहे.

लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत बांगलादेशचे वाढलेले आयात शुल्क, निर्यातीवर कमी झालेले अनुदान, वाहतुकीवर न मिळणारे अनुदान हे प्रश्‍न पोचवले जाणार आहेत. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या शिवाय हवामान तज्ज्ञांनी आता वर्तवलेल्या अंदाजानुसार आताचा पाऊस थांबल्यावर ऑक्टोंबर छाटणीला वेग येऊ शकेल.

द्राक्षांच्या भावाचा प्रश्‍नाची शक्यता

द्राक्षांना भाव मिळावा म्हणून टप्प्याटप्प्याने द्राक्षांच्या बागांमध्ये छाटणी करण्याचा आग्रह शेतकऱ्यांकडे धरला जायचा. पण आताच्या हवामानाच्या स्थितीमुळे बहुतांश शेतकरी छाटण्या एकदम करतील. परिणामी, या छाटलेल्या बागांमधील द्राक्षे एकावेळेस विक्रीस उपलब्ध होतील. त्यातून यंदा द्राक्षांच्या भावाचा प्रश्‍न तयार होण्याची शक्यता श्री. भोसले यांना वाटत आहे.

"द्राक्ष उत्पादक पूर्वी नक्षत्र बघायचे. नक्षत्राचे वाहन पाहत होते. त्यानुसार द्राक्ष बागांची छाटणी केली जायची. पण आता तंत्रज्ञान उपलब्ध झाले. त्याच्याआधारे पावसाचा अंदाज घेतला जातो. मात्र हवामान तज्ज्ञ वेगवेगळा अंदाज वर्तवत असल्याने द्राक्ष उत्पादकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय पूर्वीपेक्षा आता एकदम आणि अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे द्राक्षशेतीचे बिघडलेले वेळापत्रक काही केल्यावर रुळावर येत नाही. त्यामुळे द्राक्षशेतीपुढे संकटांची मालिका कमी होण्याचे नाव घेत नाही."

- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

Grapes News
Dhule Crime : गुंगीकारक औषधांचा साठा जप्त; 2 अटकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com