नाशिक : नाफेडकडून भिन्न भावाने कांद्याची खरेदी

लासलगावला एक लाख क्विंटलने आवक
Onion
OnionSakal

नाशिक - ‘नाफेड’तर्फे शेतकऱ्यांकडून कांद्याची थेट खरेदी किलोला ३० रुपये या भावाने करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र जिल्हानिहाय खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचा भाव मागणीच्या तुलनेत एकतृतीयांश अन् भिन्न असल्याचे आढळल्याने संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या कंपन्यांकडून कांद्याच्या खरेदीसाठीचा ‘नाफेड’चा मंगळवारचा क्विंटलचा भाव रुपयांमध्ये असा : नाशिक आणि धुळे- १ हजार २०८ रुपये ९२ पैसे, नगर व बीड- एक हजार ८३ रुपये ११ पैसे, उस्मानाबाद- एक हजार ५० रुपये, औरंगाबाद- एक हजार, पुणे- ९९७ रुपये ९२ पैसे. ही माहिती देऊन श्री. दिघोळे म्हणाले, की ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना सहा मुद्द्यांच्या माहितीसंबंधीचा मेल पंधरा दिवसांपूर्वी केला आहे. मात्र त्याचे उत्तर ‘नाफेड’कडून अद्याप मिळालेले नाही. कांद्याचे आगर असलेल्या लासलगाव बाजार समितीत एप्रिल २०२१ च्या तुलनेत या महिन्यात मंगळवारअखेर एक लाख क्विंटलहून अधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा क्विंटलचा भाव १४० रुपयांनी कमी मिळाला आहे. एप्रिल २०२१ मध्ये लासलगावमध्ये ८५ हजार २०१ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्यास ४०० ते दीड हजार आणि सरासरी ९२२ रुपये असा भाव मिळाला होता. इथे या महिन्यात एक लाख ९२ हजार १३८ क्विंटल कांद्याची आतापर्यंत आवक झाली असून, त्यास ४०० ते १ हजार ३६० व सरासरी एक हजार २१ रुपये असा भाव मिळाला. १९ एप्रिलला लासलगावमध्ये एक हजार १२० रुपये क्विंटल भावाने उन्हाळ कांद्याची विक्री झाली होती, तर मंगळवारी शेतकऱ्यांना सरासरी ९५० रुपयांवर समाधान मानावे लागले. भावातील ही घसरण पाहता, उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने गेल्या वर्षीइतका तरी भाव मिळणार काय, असे प्रश्‍नचिन्ह शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.

लाल कांदा आवकेमध्ये मोठी घट

लासलगावमध्ये एप्रिल २०२१ च्या तुलनेत या महिन्यात लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. एप्रिल २०२१ मध्ये पाच लाख ३९ हजार ९८६ क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन त्यास ३०० ते १ हजार २२० आणि सरासरी ८३३ रुपये असा भाव मिळाला होता. या महिन्यात मंगळवारअखेर ९७ हजार ९५० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यास ३०० ते ९६० व सरासरी ७०१ रुपये असा भाव मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com