esakal | नाशिकमध्ये दोन फुटाचा ससा; मऊ केसांना किलोला मिळतो 2 हजाराचा भाव

बोलून बातमी शोधा

Rabbit farm has been started in Nashik
नाशिकमध्ये दोन फुटाचा ससा; मऊ केसांना किलोला मिळतो 2 हजाराचा भाव
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : तुम्ही दोन फुटाचा ससा कधी पाहिला आहे काय, नाही ना… आता हा ससा नाशिकमध्ये पाहता येणार आहे. ससे पालनातून चांगले पैसे मिळवता येणार आहे. शहरातील मायक्रोसॉफ्ट इंजिनिअर उमेश नागरे यांनी जर्मन अंगोरा या जातीच्या सशांच्या पाच जोड्या आणल्या आहेत.

जर्मन अंगोरा नावाचा ससा मुळचा टर्की येथील आहे. जगात या सश्याच्या अकरा जाती आहेत. या सशांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावरील केसांपासून तयार होणाऱ्या लोकरीला प्रचंड मागणी आहे. त्यास किलोला दोन हजाराचा भाव मिळतो.

हेही वाचा: सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा

शेतीपूरक व्यवसाय म्हणून पर्याय

हिमाचल प्रदेशमधील कुलू इथे सरकारमान्य रॅबिट फार्म' आहेत. थंड वातावरणात हा व्यवसाय करता येत असल्याने नागरे यांनी प्रयोगासाठी पाच जोड्या आणल्या आहेत. या सशांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामुळे माणसाला कोणतीही ॲलर्जी होत नाही. घास आणि सुका चारा हे त्याचे खाद्य आहे. एक ससा वर्षाला एक किलो लोकर देतो, तसेच हौसे खातर हे ससे पाळले जातात. १५ जुलैपासून नागरे त्यांच्या आई नंदिनी नागरे यांच्या स्मरणार्थ नाशिकमध्ये पाळीव प्राण्यांचे माहिती केंद्र सुरु करत आहेत. इथे विविध जातीच्या कोंबड्या, बदक, फिजंट, ससे, गिनिपिग, उंदीर, कबूतर आदींच्या अनेक जाती पाहता येतील. मोफत माहिती व मार्गदर्शन ते करणार आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा पर्याय शेतकऱ्यांना निवडता येणार आहे. मार्गदर्शनामध्ये पाळीव प्राण्यांचे कायदे, लसीकरण, बाजार, खर्च अशी सर्व माहिती ते मोफत देणार आहेत. तसेच कोरोना महामारी मुळे ज्यांना येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी व्हिडिओवरुन ते माहिती देणार आहेत.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

अनेक विदेशी पक्षी, प्राणी यांच्यातून चांगला व्यवसाय करता येतो. त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी नाशिकमध्ये पहिल्यांदा माहिती केंद्र सुरु केले जाईल. केंद्रात प्रात्यक्षिकांसह माहिती मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहे.

- उमेश नागरे