मालेगाव हिंसाचार | दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raza academy

Malegaon : दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

नाशिक : "मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे येत आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. दरम्यान रझा अकादमीच्या (raza academy) मुख्य कार्यालयाची सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी तपासणी केली. अटक केलेल्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अतिक अहमद यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ४१ झाली आहे. अटक केलेल्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

शहरातील इस्लामपुरा भागातील रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर मध्यरात्री छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. यात काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे किंवा काय याची तपासणी सुरु असल्याचे अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले. हिंसाचारप्रकरणी आज शहर पोलिसांनी सात, आयशानगर पोलिसांनी एक अशा आठ जणांना अटक केली. दरम्यान किल्ला पोलिसांनी यु ट्यूबवरील प्रक्षोभक व धार्मिक भावना भडकविणारी चित्रफीत प्रसारित केल्याच्या गुन्ह्यात अम्मार अन्सारी या तरुणाला अटक केली. हिंसाचार प्रकरणात संशयित असलेल्यांना अटक करण्यासाठी तसेच दगडफेक व तोडफोडीच्या चित्रफिती पाहून संशयितांची ओळख पटविण्यासाठी सहा पथक गठित करण्यात आले आहेत. चित्रफीतपाहून ओळख पटल्यानंतर साक्षीदारांमार्फत खात्री झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराध व्यक्तीला अटक करण्यात येणार नाही. शहरवासीयांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन श्री. खांडवी यांनी केले.

एमआयएम आमदारांचे गंभीर आरोप.

मालेगावमध्ये दंगलीप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. ते म्हणाले मालेगावमध्ये दंगल घडवून आणण्याचा काही समाजकंटकांचा कट होता. मात्र, मालेगावच्या नागरिकांनी तो उधळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत. त्यालाही आमदार मौलाना मुफ्ती यांनी दुजोरा दिला. शिवाय आठ दिवसांपू्रवी नगरसेवक अयुब हलचलने त्रिपुरा घटनेबाबत बैठक घेतली. भडकावू भाषण केले. मात्र, याची पोलिसांनी दखल घेतली

हेही वाचा: दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज : शरद पवार

रझा अकादमीच्या लोकांना पैसे वाटले

आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले की, दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे. मुंबईतून रझा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई - भाजपा

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर अखेर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला. रॅली काढली. त्यानंतर हिंसाचार उसळला. त्यात अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी आयोजकांवर फक्त गुन्हा दाखल झाला होता. पुढची कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांच्या या भूमिकेवर स्वतः आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे रात्री उशिरा रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे टाकून कारवाई करण्यात आली.

loading image
go to top