ॲंकर
NSK26H31625
रेल्वे कर्मचारी भरत ठाकूर
----
NSK26H31627
जळगाव : फलाटावर रेल्वे कर्मचारी भरत ठाकूर मुलीला वाचवितानाचे ‘सीसीटीव्ही’ छायाचित्र.
----
गाडी सुटली...चिमुकली पडली; कर्मचाऱ्याने झेप घेत वाचविले प्राण
जळगावात कर्नाटक एक्स्प्रेसच्या गर्दीत थरार; रेल्वे कर्मचारी भरत ठाकूर यांच्या सतर्कतेने टळला अनर्थ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : रेल्वे सुटली...आई-वडील फलाटावरून गाडीच्या मागे धावत होते... आणि गर्दीच्या डब्यातून एका व्यक्तीच्या हातातून तीन वर्षांची चिमुकली अचानक फलाटावर कोसळली. क्षणाचाही विलंब झाला असता तर ती गाडीखाली जाण्याची शक्यता होती. मात्र, हा थरारक प्रसंग पाहत असलेल्या रेल्वे कर्मचारी भरत ठाकूर यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ झेप घेतली आणि चिमुकलीला गाडीखाली जाण्यापासून वाचविले. त्यांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले.
ही घटना सोमवारी (ता. ५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर घडली. गाडी क्रमांक १२६२७ कर्नाटक एक्सप्रेसने जळगाव स्थानक सोडण्यास सुरुवात केली होती. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील हजरतपुरी येथील अब्दुल हसन आणि रविना हसन हे दाम्पत्य तीन वर्षांच्या चिमुरडीसह मथुरेला जाण्यासाठी जळगाव स्थानकावर आले होते.
गर्दीमुळे आई-वडील खालीच
कर्नाटक एक्स्प्रेसच्या सर्वसामान्य डब्यात चढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत चिमुरडी डब्यात चढली; मात्र तिचे आई-वडील फलाटावरच राहिले. गाडी सुरू होताच अब्दुल हसन आणि रविना हसन यांनी मुलीला आवाज देत गाडीच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, डब्यातील एका प्रवाशाने चिमुरडीला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. गाडीने वेग घेतलेला असतानाच त्यांच्या हातातून चिमुकली फलाटावर पडली.
चौकट
चिमुकलीच्या दिशेने झेप
चिमुकली गाडीखाली जाण्याच्या धोकादायक स्थितीत असल्याचे रेल्वे कर्मचारी (बॉक्स बॉय) भरत ठाकूर यांच्या नजरेस पडले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीच्या दिशेने झेप घेतली आणि तिला सुरक्षितपणे गाडीच्या बाजूला घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी या मुलीला तिचे वडील अब्दुल हसन आणि आई रविना हसन यांच्या स्वाधीन केले. मुलगी सुखरूप मिळाल्यानंतर पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ठाकूर यांच्या प्रसंगावधानामुळे घडलेला हा प्रकार एका मोठ्या दुर्घटनेत बदलण्यापासून थांबला.