येवल्यात ४४ दिवसांत ९४ मिमी पाऊस

Yeola News
Yeola NewsSakal

येवला (जि. नाशिक) : नेहमीच खरिपाच्या पेरणीसाठी प्रतीक्षा करायला लावणारा वरुणराजा यंदा सलामीलाच दमदार रुसला आहे. वरुणराजाने सर्व अंदाज खोटे ठरवल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. रोज दाटलेल्या ढगामुळे आज चांगली हजेरी लागणार हे बांधले गेलेले अंदाज अन्‌ प्रत्यक्षात पावसाच्या हुलकावणीमुळे बळीराजा चिंतेत आहे. सलामीच्या ४४ दिवसांत केवळ ९४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. समाधान म्हणजे रविवारी (ता.११) तब्बल ४५ मिलिमीटर झालेल्या पावसाने हलकासा दिला दिलासा दिला असून, सुकू लागलेली पिके पुन्हा जोमाने तरारली आहेत. (Yeola rain update yeola received 94 mm of rain in 44 days)

यंदा पावसाने वेळेत हजेरी लावली असली तरी हा पाऊस फक्त पडला असे म्हणण्याइतकाच आहे. तालुक्याची भौगोलिक रचना विषम स्वरूपाची असल्याने प्रमाणात मोठी तफावत आहे. राजापूर, नगरसूल, सायगाव, ममदापूर, रहाडी, भारम या भागांत तशी नेहमी पावसाची अवकृपा असते. पण, यंदा याच भागात चांगला पाऊस आहे. तर तालुक्याच्या पश्‍चिम भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. सध्याची स्थिती पाहता अजून दोन-तीन मुसळधार पाऊस पडल्यावरच खरिपाला बळ मिळणार असून, बंधारे, इतर जलसाठे व विहिरींना पाणी येणार आहे.

तालुक्याची पर्ज्यन्याची वार्षिक सरासरी केवळ ४८९ मिमी आहे. ब्रिटिशांच्या यादीत दुष्काळी असलेल्या या तालुकाची साडेसाती अजून संपलेली नसून वार्षिक सरासरी अल्प मिलिमीटर असली तरी ती गाठताना नाकीनऊ येते. यंदाही समाधानकारक पाऊस पडलेला नसून एक-दोन पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकवल्या. तर मध्ये २०-२२ दिवस पूर्णतः उघडीप दिल्याने झालेली पेरणी अडगळीत सापडली होती. मात्र, ८ तारखेपासून हलका पाऊस पडत असल्याने पिकांना जीवदान मिळालेच. पण रविवारी मुसळधार हजेरी लावल्याने झालेली पेरणी मार्गी लागली असून, रखडलेल्या पेरणीला वेग आला आहे.

पावसाअभावी भूजल पातळीत वाढ झाली नसल्याने अद्याप विहिरींना पाणी आले नसून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शहरातील पर्जन्यमापकावर १ ते ३० जूनच्या दरम्यान केवळ ३२, तर आजपर्यंत ९४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी आजपर्यंत तब्बल २५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा पिकांच्या हिशेबाने पावसात सातत्याचा अभाव जाणवत आहे. ४४ दिवसांत येवल्यात ९४, तर अंदरसूल मंडळात सर्वाधिक १३६ मिलिमीटर नोंद झाली आहे. २८ जून व ११ जुलै या दोन दिवशीच्या जोरदार पावसानेच आतापर्यंत आधार दिला आहे.

कुठे धो धो… तर कुठे सो सो…

जून ते सप्टेंबरचे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५३ तर ऑक्टोबरपर्यंत ४८९ मिलिमीटर आहे. तर, जून महिन्याची सरासरी ११४ मिलिमीटर असतांना येवल्यात केवळ ३२ तर अंदरसूलला ८९ मिमी पाऊस पडला होता. आतापर्यंत शहरांमध्ये तब्बल ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात काही गावांना जोरदार तर काही गावांना अल्पसा पाऊस पडला असून, भौगोलिक रचनेनुसार अर्ध्या तालुक्याला अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. ११ जुलैला येवल्यात ४५, अंदरसूलला ३५, नगरसूलला ६, पाटोद्यात ३०, सावरगावला ३ तर जळगाव नेऊरला २७ मिमी पाऊस पडला असून, हा ४४ दिवसातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मागील वर्षी आजपर्यंत २५९ तर यंदा केवळ ९४ मिमी तर २०.७२ टक्के पाऊस पडला असल्याने मोठी उणीव या पावसाने ठेवली असून, जोरदार पावसाकडे डोळे लागले आहे.

आकडे बोलतात…

* आजपर्यंत पाऊस : ९४ मिमी

* जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान : ११० मिमी

* जुलै महिन्यातील पडलेल्या पाऊस : ५२ मिमी (५८ टक्के)

* जून ते सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान : ४५३ मिमी

* आतापर्यंत पावसाची सरासरी : २०.७२ टक्के

Yeola News
इंधन दरवाढीमुळे यंत्राद्वारे शेती अडचणीत

मंडळनिहाय पाऊस

तालुका - जूनअखेर - आजपर्यंत

येवला - ३२ - ९२

अंदरसूल - ८९ - १३६

नगरसूल - ३१ - ४६

पाटोदा - ५८ - ९०

सावरगाव - ३९ - ४९

जळगाव नेऊर - २९ - ७१

(Yeola rain update yeola received 94 mm of rain in 44 days)

Yeola News
नाशिक जिल्ह्यात आज १३४ कोरोना बाधित, चौघांचा मृत्‍यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com