esakal | सोमवारपासून चांगल्या पावसाचा अंदाज! खरिपाच्या पेरण्यांना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

rain

सोमवारपासून चांगल्या पावसाचा अंदाज! खरिपाच्या पेरण्यांना वेग

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला लागला आहे. त्यामुळे पावसासाठी हवामान अनुकूल होऊ लागले असून, शुक्रवार (ता. ९)पासून तळकोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. शनिवार (ता. १०)पासून संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस होऊ शकेल. त्याच वेळी राज्यात सर्वदूर सोमवार (ता. ११)पासून चार दिवस चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण त्याच वेळी शुक्रवार (ता. ९)पासून रविवार (ता. १०)पर्यंत राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (rains-forecast-in-state-from-Monday-nashik-marathi-news)

खरिपाच्या पेरण्यांना येणार वेग; पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार कमी

हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी ही माहिती दिली. कोकणात आठ दिवस जोरदार पाऊस हजेरी लावत राहील, असाही अभ्यासकांचा अंदाज आहे. राज्यभर सुरू होणारा पाऊस १५ ते २१ जुलैला उघडीप घेऊन २१ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला होण्याची शक्यता आहे. पुढे ५ ते १० ऑगस्टला उघडीप घेतल्यानंतर १० ते २५ ऑगस्टला आणि नंतर १० ते २५ सप्टेंबरला राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वरुणराजाने उघडीप घेतली, तरीही ढगाळ हवामान राहणार आहे. या पावसाची विशेषतः सोयाबीन पिकाला चांगली मदत अपेक्षित आहे. दरम्यान, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात गेल्या २४ तासांपूर्वी जोरदार पाऊस झाला आहे. पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत विदर्भात जोरदार, तर कोकण-गोवा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण-गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. आताच्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत वरुणराजाची झालेली कमतरता भरून निघू शकेल. त्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि अमरावती विभागाचा समावेश असेल. गेल्या वर्षी ८ जुलैपर्यंत ३२६.७ मिलिमीटर सरासरी पाऊस राज्यात नोंदविला गेला होता. गुरुवारी सकाळपर्यंत ३०५.८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस राज्यात झाला आहे. विभागनिहाय आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्या वर्षी ८ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शविते) : कोकण- १०७.१ (१००.१), नाशिक- ६६.६ (१२६.२), पुणे- ८७.४ (९०.१), औरंगाबाद- १२५.१ (१३६.६), अमरावती- १०६.६ (११८.२), नागपूर- १०२.२ (९६.६). राज्य- १०४.४ (१११.५).

आठवड्यात १५६ टँकर झाले बंद

पावसाच्या राज्यातील मध्यंतरीच्या हजेरीमुळे एका आठवड्यात राज्यातील १५६ टँकर बंद झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. २८ जून २०२१ ला २५० टँकर सुरू होते. गेल्या वर्षी ६ जुलैला ८६ टँकर सुरू होते. म्हणजेच, राज्यात सर्वदूर पाऊस झाला नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टँकर अधिक सुरू राहिले. आताच्या पावसामुळे टँकर वेगाने कमी होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हानिहाय पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या टँकरची संख्या ः नाशिक- २७, जळगाव- ८, नगर- १९, पुणे- ४, सातारा- ४, हिंगोली- ५, उस्मानाबाद- १, बुलडाणा- २०, नागपूर- ६.

हेही वाचा: भुजबळांच्या चिमट्यांनी भाजप नेत्यांना ठसके!

खरिपाची पेरणी ११ टक्क्यांनी कमी

राज्यात ६ जुलै २०२० ला ७५.११ टक्के क्षेत्रावर ऊस वगळून खरिपाच्या पेरणी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत एक कोटी ४१ लाख ९८ हजार हेक्टरपैकी ९१ लाख ९५ हजार हेक्टरवर म्हणजेच, ६४.७७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भात आणि नाचणी, नागलीच्या रोपे टाकण्याची कामे अंतिम टप्प्यात पोचली आहेत. भातलागवडीसाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार चिखलणी आणि रोपांच्या पुनर्लागवडीची कामे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी मात्र पावसाअभावी भाताची रोपे पिवळी पडण्यास सुरवात झाली आहे. शिवाय पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणी झालेली पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार यापुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास आपत्कालीन पिकांचे नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पंधरा शस्त्रक्रिया होऊनही जिद्दी शिक्षिकेने दिले कॅन्सरलाच आव्हान..!

खरीप हंगामातील पेरणी

(सरासरी क्षेत्र आणि पेरणी क्षेत्र लाख हेक्टरमध्ये)

तृणधान्य- सरासरी क्षेत्र ३६.३७ (पेरणी क्षेत्र- १०.२)

कडधान्य- सरासरी क्षेत्र २२.१९ (पेरणी क्षेत्र- १५.१२)

अन्नधान्य- सरासरी क्षेत्र ५८.५६ (पेरणी क्षेत्र- २५.१३)

तेलबिया- सरासरी क्षेत्र ४१.५८ (पेरणी क्षेत्र- ३६.११)

कपाशी- सरासरी क्षेत्र ४१.८४ (पेरणी क्षेत्र- ३०.७१)

लागवडीचा ऊस- सरासरी क्षेत्र ९.३५ (लागवड क्षेत्र-०.९९)

एकूण पेरणी क्षेत्र (ऊस वगळून)- सरासरी क्षेत्र १४१.९८ (पेरणी क्षेत्र- ९१.९५)

एकूण पेरणी क्षेत्र (उसासह)- सरासरी क्षेत्र १५१.३३ (पेरणी क्षेत्र- ९२.९४)

loading image