शहरात दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट; वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike Thief

शहरात दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट; वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण

नाशिक : शहर परिसरामध्ये दुचाकी (Bike) पार्क केल्यानंतर ती त्याचठिकाणी मिळेल, याची कोणतीही शाश्‍वती राहिलेली नाही. पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी केला जात असल्याचा दावा होतो खरा, परंतु तरीही सोनसाखळी (Gold Chain) अन्‌ दुचाक्या चोरट्यांना (Bike Thieves) लगाम घालता आलेला नाही हेही वस्तुस्थिती आहे. यामुळे शहरात दुचाक्या चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळच घातला असून, वाहनधारकांमध्ये मात्र भितीचे वातावरण आहे. शहरातील पंचवटी, अंबड, उपनगर, गंगापूर आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. (raising bike thieves in city Nashik Crime news)

वनिता पेखळे (रा. दामोदरनगर, हिरावाडी, पंचवटी) यांची २० हजार रुपयांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ एफजे ५५३८) गेल्या महिन्यात हिरावाडीतील सप्तश्रृंगी हॉस्पिटलसमोर पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. महिनाभर शोध घेऊनही न मिळाल्याने पंचवटी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष चौरे (रा. निलगिरी बाग, कैलास नगर, औरंगाबाद रोड) यांची ३५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच ३९ एक्स ०७६७) राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्याने गेल्या रविवारी (ता.२६) मध्यरात्री चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, विकास तरखडकर (रा. सरला अपार्टमेंट, शरणपूर रोड) यांची ३० हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ जीएस ५४६९) सिटी सेंटर मॉलसमोरील मोकळ्या जागेत पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने गेल्या २३ तारखेला रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ठक्का कोल्हे (रा. महाकाली चौक, सिडको) हे गेल्या शनिवारी (ता.२५) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास संभाजी स्टेडिअम येथे फिरण्यासाठी गेले असता, २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५ जीएच ८३५६) बुरकुले हॉलजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, पाचवी दुचाकी ही देवळाली गावात भरणाऱ्या बाजारातून चोरीला गेली. बिहारी यदू रॉय (रा. वडनेर दुमाला, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार ते गेल्या सोमवारी (ता.२७) देवळाली गावच्या सोमवारच्या बाजारात गेले असता, दर्ग्यासमोर २५ हजारांची दुचाकी (एमएच १५ डीपी ९६८३) पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: दिंडोरीसह अजंग अन् विंचूरमध्ये 7 हजार 120 कोटींची औद्योगिक गुंतवणूक

"शहरात ठिकठिकाणी पोलीसांकडून नाकाबंदी केली जाते. गेल्या काही दिवसात दुचाक्या चोरी करणाऱ्या टोळ्याही जेरबंद केल्या आहेत. तरीही घटना घडत असून त्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. पोलीस ठाणेनिहाय आणखी कठोर नाकाबंदीच्या सूचना दिल्या आहेत." - वसंत मोरे, सहाय्यक आयुक्त, गुन्हेशाखा, नाशिक.

हेही वाचा: नाशिक : पाथर्डी फाटा येथे महिलेची पोत खेचली

Web Title: Raising Bike Thieves In City Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..