Latest Marathi News | रामसेतूचा तिढा कधी सुटणार?; नूतनीकरणाचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramsetu on Goda Ghat

Nashik : रामसेतूचा तिढा कधी सुटणार?; नूतनीकरणाचे काम रखडले

नाशिक : शहरातून पंचवटीत व पंचवटीतून शहरात पायी जाणाऱ्या नाशिककरांसाठी ६७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला रामसेतू सध्या धोकादायक अवस्थेत आहे. या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल अद्यापही नाशिक महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या पुलाच्या नूतनीकरणाचे काम रखडले असून, हा तिढा कधी सुटणार यावर या पुलाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र हा पूल तोडून नवीन पूल बांधण्यास पोलिसांसह स्थानिकांनी विरोध केल्याने नवीन पूल की केवळ डागडुजी होते, हे अवलंबून आहे. (Ram Setu on goda ghat Renovation work stopped Nashik Latest Marathi News)

नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९५५ ला तत्कालीन नगराध्यक्ष भय्यासाहेब पांडे यांच्या कार्यकाळात या पुलाची उभारणी करण्यात आली. त्या काळात शहरातील वाहनांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने खास पायी जाणाऱ्यांसाठी या पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या पुलाने अनेक पुरांसह चक्क चार महापूरही अनुभवले. दरम्यानच्या काळात या पुलाचे रुंदीकरणही करण्यात आले.

अनेक पूर, महापूर अनुभवलेल्या या पुलाच्या मध्यभागी सध्या तडे गेले असून जुना व नवा पूल यांच्यात मोठी फट पडली आहे. याशिवाय अनेक ठिकाणचे काँक्रिटीकरणही निखळले आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक अवस्थेत आहे. मध्यंतरी या पुलाच्या जागी स्मार्टसिटीकडून नवीन पुलाचे काम सुरू करण्यासाठी तज्ज्ञांनी पाहणीही केली होती, परंतु त्या वेळी काही स्थानिक नागरिकांनी पुलावरील व्यावसायिकांना हाताशी धरत या कामाला तीव्र विरोध दर्शविला होता.

हेही वाचा: Nashik : घर सोडून गेलेल्यांची पोलिसांमुळे ‘घरवापसी’

स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल बाकी

मध्यंतरी स्मार्टसिटी कंपनीने राज्य शासनाकडून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटही केले आहे. परंतु त्याचा अहवाल अद्यापही स्मार्टसिटी किंवा महापालिकेचा प्राप्त न झाल्याने हे काम रखडले आहे. हा अहवाल आल्यानंतर नवीन पूल की केवळ नूतनीकरण हे ठरणार आहे. हा पूल धोकादायक ठरवून त्यावरून जाण्या- येण्यास बंदीही घालण्यात आली होती, परंतु नंतर ही बंदी उठविण्यात आली.

व्यावसायिकांचे अतिक्रमण

सततच्या पुरांमुळे आधीच धोकादायक बनलेल्या या पुलावर गेल्या अनेक वर्षांपासून कपडे व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नूतनीकरणानंतर दुप्पट झालेल्या या पुलाच्या निम्म्या भागावर अतिक्रमण झाले आहे. येथे व्यवसाय करणाऱ्यांनी पुलावर चक्क ताडपत्री लावल्याने पुलाला ओंगळ स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच पुलाच्या अनेक भागातील स्लॅबही पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

हेही वाचा: Nashik : ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्‍यकच : पोलीस आयुक्त