
Ramzan festival | रमजानची खरेदी रिक्षा व्यवसायिकांच्या पथ्यावर
मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पूर्व भागातील बाजारपेठेत रमजान (Ramzan Festival) निमित्त कपडे, सुकामेवा, सुतरफेनी, सौंदर्य प्रसाधने, चप्पल, बुट आदी वस्तू बाजारात दाखल झाले आहेत. शनिवारी (ता. १६) रमजानचा १४ वा रोजा आहे. नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. विशेषत: हद्दवाढ झालेल्या भागातून दरेगाव, रमजानपुरा, पवारवाडी, कॅम्प, म्हाळदे शिवार यासह ग्रामीण भागातील नागरीक कुटुंबियांसह कपडे खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. दुपारी उन्हाचा चटका व उपवास असल्याने नागरीक रात्री कपडे खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येथील रिक्षाचालकांना (auto rikshaw drivers) सुगीचे दिवस आले आहेत.
शहर व परिसरात सुमारे पाच ते सहा हजार रिक्षा असल्याचा अंदाज आहे. रमजानच्या खरेदीसाठी बहुसंख्य नागरीक कुटुंबियांसह बाहेर पडतात. त्यावेळी दुचाकीऐवजी रिक्षाला पसंती दिली जाते. कपडे खरेदीसाठी येथील गांधी मार्केट, अंजुमन चौक, सरदार मार्केट, सिंधी मार्केट, किदवाई रोड आदी ठिकाणी महिला, मुले, पुरुषांचे कपडे व बुट, चप्पल खरेदीसाठी नागरीक बाजारात येत आहेत. विशेषत: उपवास असल्याने नागरीक सायंकाळी आठनंतर घरातून बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर येथे पाचोरा, जळगाव, धुळे, नंदुरबार, येवला, कोपरगाव, शिर्डी तसेच कसमादे परिसरातील नागरीक कपडे व इतर वस्तु खरेदीसाठी बाजारात येत आहेत. बाहेरुन येणारे नागरीकही रिक्षाचालक योग्य त्या ठिकाणी कमी वेळेत नेऊन सोडत असल्याने रिक्षाला प्राधान्य देतात.
हेही वाचा: तोंड बंद ठेवा.. कारण मोदींची नक्कल करणं गुन्हा आहे; तब्बल पाच वर्षांनी श्याम रंगीला ने मांडली खंत
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले तरी या ठिकाणी रिक्षा व्यवसायात स्पर्धा असल्याने कमी पैशात रिक्षाचालक प्रवाशांना विशेष बाजारात पोहोच करीत आहेत. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना रिक्षाच एकमेव पर्याय व स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडूनही रिक्षाला पसंती दिली जात आहे. येथील गांधी मार्केटमध्ये महिलांचे कपडे, बुरखा, हार, सौंदर्य प्रसाधने, पुरुषांचे ड्रेस, लहान मुलांचे कपडे एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरीक मोठ्या प्रमाणात गांधी मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत.
हेही वाचा: प्रशांत किशोर यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसीची होणार?
दर शुक्रवारी रिक्षांना मागणी
शहरात शुक्रवार म्हटले की छोटेखानी ईद साजरी केली जाते. विवाह झालेल्या मुली जुम्मा साजरा करण्यासाठी आपल्या आई- वडिलांच्या घरी जातात. शुक्रवारी सुटीचा दिवस असल्याने येथील यंत्रमाग पुर्णत: बंद असतो. त्यामुळे बहुतेक नागरीक सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरण्यासाठी कुटुंबियांसह जातात. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला आठवड्यातून एक दिवस चांगला दिवस येत असल्याचे रिक्षाचालक एजाज अहमद यांनी सांगितले.
Web Title: Ramadan Festival Shopping Useful For Rickshaw Drivers Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..