esakal | टोल वसुली जोमात, महामार्ग मात्र कोमात! खड्यांचा रास्तारोकोने निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

khadde

टोल वसुली जोमात, महामार्ग मात्र कोमात!

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : कोणता खड्डा चुकवावा अन् कुठून गाडी चालवावी अशी परिस्थिती मालेगाव-कोपरगाव राज्य महामार्गावर येवला परिसरात झाली आहे. खड्यांमुळे महामार्गाची चाळण होऊन गाडी चालवणे जिकिरीचे बनले आहे. टोल प्रशासन मात्र वसुली जोरात करत असून महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने आज विसापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करत यापुढे चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बांधकाम विभागाचे टोल प्रशासनाला सहकार्य

बीओटी तत्त्वावर मालेगाव-मनमाड-येवला-कोपरगाव हा महामार्ग झाला आहे. येवल्याजवळ पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर वाहनांची जोरात वसुली सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष होते, रस्त्यावर खड्डे पडून वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. आता छोट्याशा पावसाने देखील रस्त्यावर खड्डे वाढले आहेत. यामुळे गाडी चालविणे जिकिरीचे झालेच, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दोन महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून टोल प्रशासनाकडून ठेकेदाराच्या माध्यमातून महामार्गावरील खड्यांची दुरुस्ती करण्यात आली. बुजवलेले खड्डे पावसाळ्यातील पाण्याने मोठी झाली असून दोन ते तीन फुटांचे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. बांधकाम विभागही याकडे दुर्लक्ष करत टोल प्रशासनाला सहकार्य करत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

खड्यांमुळे वाढल्या चोऱ्या!

खड्यांमुळे रात्रीच्या वेळेस महामार्गावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाचे अभियंता यास कारणीभूत असल्याने या अभियंत्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी स्वारीपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी यावेळी केली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ आंदोलन झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे सर्व स्तरातील नागरिकांनी या आंदोलनाचे स्वागत केले असून रस्ता दुरुस्त न झाल्यास सर्व जण रस्त्यावर उतरतील अशी भूमिका व्यक्त होत आहे.

टोल प्रशासन वसुली जोरात करत असून महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे विसापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

टोल प्रशासन वसुली जोरात करत असून महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे विसापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

स्वारीपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली विसापूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात माजी सभापती डॉ. सुधीर जाधव, विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, विनोद त्रिभुवन, मयूर सोनवणे, विधाता आहिरे, बाळा सोनवणे, हमजा मनसुरी, सुरेश सोनवणे, संतोष आहिरे, आकाश गोतीस, बाळासाहेब गायकवाड, भीमराज गायकवाड, तुषार आहिरे, शरद गायकवाड, आशा आहेर, स्मिता झाल्टे, ज्योती पगारे, उषाताई पगारे, संगीता रणधीर, पार्बताबाई पगारे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा: मालेगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावला

loading image
go to top