esakal | एका डोसनंतर कोरोनाबाधितांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत.. आरोग्य विभागापुढे आव्हान

बोलून बातमी शोधा

vaccination
एका डोसनंतर कोरोनाबाधितांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत.. आरोग्य विभागापुढे आव्हान
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर मृत्यूच्या संकटापासून वाचण्यासाठी म्हणून लसीकरण केंद्रांवर तोबा गर्दी होऊ लागली आहे. पण त्याच वेळी एका डोसनंतर कोरोनाची बाधा होणाऱ्यांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत पोचल्याने आरोग्य विभागापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. अगदी सुरवातीच्या काळात लसीकरणाच्या अगोदर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ‘पॉझिटिव्ह’चे प्रमाण ४ ते ५ टक्क्यांपर्यंत आरोग्य विभागाला आढळून आले. लसीकरणाविषयीचा गैरसमज पसरू नये म्हणून ही चाचणी तातडीने बंद करण्यात आली.

लसीकरणावेळी आढळले ‘पॉझिटिव्ह

लस घेतली आणि कोरोनाची लागण झाली अशी उदाहरणे अवतीभोवती बघावयास मिळाली आहेत. ही सामाजिक सल नेमकी कशातून तयार झाली याचा शोध घेतला असता, त्यात कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतली, की लोक निष्काळपणी करतात. आरोग्य विभागाच्या पाहणीत एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले गेले आहे, ते म्हणजे, निम्मे लोक मास्क वापरत नाहीत. जे मास्क वापरतात, त्यांच्या निम्म्या जणांच्या नाकाखाली मास्क असतो. उरलेले निम्मे लोक बोलताना तोंडावरचा मास्क काढतात. एकत्र जमून चर्चा करत बसतात, पार्ट्या झोडतात. हात सातत्याने स्वच्छ धूत नाहीत. शारीरिक अंतर राखले जात नाही. नेमकी हीच परिस्थिती लसीकरणानंतरही कोरोनाची बाधा होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. त्याच वेळी लसीकरण केंद्रावर लशीसाठी होणारी गर्दी आवाक्याबाहेर जात असल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे १८ वर्षांच्या पुढील जनतेला लस देण्याची भूमिका सरकारने स्वीकारत असताना गोंधळ होणार नाही याकडे लक्ष देण्यासोबत लसीकरण केंद्रांवर शारीरिक अंतर राखले जाईल, मास्कचा वापर होईल, हात स्वच्छ धुतले जातील यास प्राधान्य देणे आवश्‍यक बनले आहे.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

नाशिक विभागात १८ टक्के लसीकरण

नाशिक विभागाची ४५ वर्षांवरील लोकसंख्या ६४ लाख ७१ हजार २०८ इतकी असून, आतापर्यंत १७.७६ टक्के लसीकरण झाले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील २१.३३, नगरमधील १८.८३, धुळ्यातील १७.९४, जळगावमधील १३.९२, नंदुरबारमधील ११.५० टक्के लसीकरणाचा समावेश आहे. याशिवाय राज्य सरकारने नव्याने स्वीकारलेल्या धोरणानुसार १८ वर्षांपुढील जवळपास ४५ टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाची व्यवस्था आरोग्य विभागाला करावी लागणार आहे. सद्यःस्थितीत भारतीय लस केंद्रांपर्यंत पोचविण्यासाठी दोन ते आठ डिग्री तापमानाची नाशिक विभागात ५६१ शीतसाखळी केंद्रे तयार करण्यात आली आहेत. विभागातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. सद्यःस्थितीत पुण्याहून लस आणण्यासाठी दररोज नाशिकहून खास वाहन पाठविले जाते. सत्तर हजारांपासून ते एक लाखांपर्यंतचे डोस एकावेळी विभागासाठी मिळतात. लसीकरणासाठी अपुऱ्या पडणाऱ्या लशीचा प्रश्‍न एकीकडे असताना आणखी ४५ टक्के लोकसंख्येच्या लशीकरणासाठी लस कशी मिळेल याबद्दलची चिंता आरोग्य यंत्रणेत आहे. सरकारने लस उपलब्धतेचा प्रश्‍न न सोडविल्यास सहा महिन्यांत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सफल करण्याबद्दल प्रश्‍नचिन्ह तयार होईल आणि तिसऱ्या लाटेत राज्यातील जनतेच्या हाल-अपेष्टा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या आणि त्यांच्यासाठी सुविधांचा वापर करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार काय, या प्रश्‍नाने सद्यःस्थितीत आरोग्य यंत्रणेला ग्रासले आहे.

‘वॉकिंग कूलर’ची मान्यता

देशात तयार करण्यात येणाऱ्या लशींच्या उपलब्धतेचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने लशी आयात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पण परदेशातील लशींसाठी उणे ७० डिग्रीपेक्षा कमी तापमानाची साठवणूक व्यवस्था लागणार असल्याने त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेची तयार काही झाली आहे काय हे पाहिल्यावर विभागस्तरावर ‘वॉकिंग कूलर’ला मान्यता मिळाले असून, त्याचे काम लवकर सुरू होईल. पण विभागस्तरावरून इतक्या कमी तापमानात लस केंद्रापर्यंत कशी न्यायची, हा प्रश्‍न विचारल्यावर अधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचे मार्गदर्शन यायचे आहे, असे सांगितले.

हेही वाचा: १४ जूनपासून शाळा सुरू; अशी असेल खबरदारी

कोरोनाची लस घेतली म्हणजे, आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, असा समज करून घेणे चुकीचे आहे. तुम्ही लस घेतली असेल आणि नाक अथवा तोंडातून कोरोनाचा विषाणू गेल्यास त्याची बाधा होणार. शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीनुसार बाधेचे कदाचित सौम्य स्वरूप असू शकेल. त्यामुळे लसीकरण कोरोना विषाणूचे बाधा होऊ नये म्हणून होत नाही हे पक्के ध्यानात ठेवून लसीकरण झाल्यावरही मास्क वापरावा, शारीरिक अंतर ठेवावे, हात सतत धुवावेत.

-डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी (आरोग्य सहाय्यक संचालक)

लसीकरणाचे दोन डोस घेतल्यावर १४ ते २१ दिवस झाल्यावर अधिक अँटीबॉडीज तयार होतात. अशा परिस्थितीत कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यातूनही कुणाला कोरोना विषाणूची अशा अवस्थेत बाधा झाल्यास सौम्य बाधा झाल्याचे निदर्शनास येते. पण एक डोस घेतल्यावर बाधा झाल्याचे दिसून येते. कारण एकतर डोस घेण्याअगोदर बाधा झालेली असते आणि लस घेतल्यानंतर लक्षणे दिसायला सुरवात होते.

-डॉ. कपिल आहेर (जिल्हा आरोग्याधिकारी)