esakal | कुख्यात रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड जेलला होणार रवानगी

बोलून बातमी शोधा

ravi pujari

गॅंगस्टर रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड जेलला होणार रवानगी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साईट्सवर २०११ मध्ये पुजारी टोळीतील चार जणांनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यात खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी यास विशेष मोक्का न्यायालयात न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासमोर गुरुवारी (ता.२९) हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश देशमुख यांनी पुजारी यास न्यायालयीन कोठडी सुनावली. सुनावणीनंतर कारागृहात रवानगी करण्यात आली. सुरक्षितेचा आढावा घेऊन आर्थर रोडला रवानगी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुख्यात रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी

पाथर्डी फाटा भागातील एकता ग्रीन व्हॅली या बांधकाम साईटवर २५ फेब्रुवारी २०११ ला भरदुपारी संशयितांनी येत रिसेप्शनिस्ट प्रियांका पलाडकर, देविका कोडिलकर, रणजीत आहेर आदींवर गोळीबार केला. यात कर्मचारी जखमी झाले. मात्र, प्रसंगावधान राखल्याने त्यांचा जीव वाचला होता. बांधकाम साईटचे मालक अशोक मोहनानी यांच्याकडून दहा कोटींची खंडणी उकळण्यासाठी आणि मोहनानी यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या तपासात हा प्रकार गँगस्टर रवी पुजारी यांच्याकडून झाल्याचे समोर आले. त्यामुळे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी पुढील तपास मुंबईच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या संजय सिंग ऊर्फ संजय नेपाळी, अरविंद प्रदीप चव्हाण ऊर्फ चिंटू, विकासकुमार सिंग, संदीप शर्मा आदी आरोपींविरोधात नाशिकच्या विशेष मोक्का कोर्टात खटला चालला. या चौघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मात्र, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रवी पुजारी परदेशात दडून बसला होता. अडीच ते तीन महिन्यांपूर्वी दक्षिण अफ्रिक्रेत असलेल्या रवी पुजारीला प्रर्त्यापण कायद्यानुसार भारताच्या हवाली करण्यात आले. कर्नाटक आणि मुंबईत दाखल विविध गुन्ह्यांमध्ये त्याची वेगवेगळ्या कोर्टात हजेरी झाली. यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सोपान निघोट यांनी मोहनानी खंडणी प्रकरणी रवी पुजारीला शुक्रवारी (ता. २३) विशेष मोक्का कोर्टाचे न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासमोर हजर केल्यावर गुरुवार (ता.२९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यास पुन्हा न्यायाधीश देशमुख यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर संशयित रवी पुजारीस न्यायालयीन कोठडी सुनावली. ॲड. सुधीर कोतवाल यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.

हेही वाचा: रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..

दोन टप्प्यांत तपास

तपासाची बाजू भक्कम राहिल्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना कोर्टाने मोक्का कायद्यानुसार जन्मठेप सुनावली आहे. आता खटल्याचा दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी