leather.png
leather.png

चामडे उद्योगातील मंदीचा मदरशांना फटका...बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बिघडणार अर्थकारण

नाशिक / मालेगाव : गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर देशातील चामडे उद्योगात मंदीचे साम्राज्य आहे. त्याचा फटका बकरी ईदच्या कुर्बानीनंतर चामडे विक्रीतून होणाऱ्या उलाढालीला बसणार आहे. राज्यातील मुस्लिम बांधव बकरी ईदला लहान-मोठ्या जनावरांची कुर्बानी केल्यानंतर जनावराचे चामडे मदरशांना दान करतात. या दानातून राज्यातील पाचशेहून अधिक मदरशांना प्रत्येकी किमान दोन लाखांचा निधी मिळतो. मोठ्या मदरशांना चामडे विक्रीतून पाच लाखांहून अधिक अर्थसहाय्य होते. यंदा चामड्याला मागणी नसल्याने मदरसे चामडे दान स्वरूपात स्विकारणार नाहीत. यामुळे बकरी ईदच्या चामड्याअभावी मदरशांचे अर्थकारण बिघडणार आहे. 

चामडे उद्योगातील मंदीचा मदरशांना फटका 
राज्यातील पाचशेहून अधिक मदरशांना चामडे विक्रीतून दहा कोटींहून अधिक रक्कम देणगी स्वरूपात मिळत होती. घरोघरी शिवाय कत्तलखान्यात बकरी ईदच्या जनावरांची कुर्बानी केल्यानंतर चामडे मदरशांना मदत व्हावी, या हेतूने दान स्वरूपात दिले जाते. राज्यातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी हीच पद्धत होती. यापूर्वी मोठ्या जनावराचे चामडे चारशे ते सहाशे रुपये दराने विक्री होत होते. गोवंश हत्याबंदीनंतर प्रामुख्याने म्हैस, उंट या मोठ्या जनावरांची कुर्बानी होते. म्हशीच्या चामड्याला (काला) फारशी मागणी नाही. ५० ते १०० रुपये या चामड्यातून मिळतील. त्यात हमाली, वाहतूक हा खर्च घेतल्यास फक्त २० ते २५ रुपये मदरशांना मिळू शकतील. त्या पार्श्र्वभूमीवर यंदा चामडे दान होणार नाही. टाकाऊ मांसाबरोबरच (आचरट) चामडेही कत्तलीच्या ठिकाणीच वेस्टेज म्हणून पडेल. यामुळे महापालिकांसमोर आचरटबरोबरच चामड्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान आहे. मालेगाव शहरातील १५ मोठे मदरसे यापूर्वी चामडे दान स्वरूपात स्वीकारत होते. बकरी ईदनंतर कोलकता, कानपूर या भागातील चामड्याचे व्यापारी मोठ्या संख्येने शहरात खरेदीसाठी येत. व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे चामड्याला चांगला भावही मिळत होता, असे अतहर अश्रफी यांनी सांगितले. 

राज्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण बिघडणार 

चामडे विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून मदरशांच्या नऊ महिन्यांचा, तर रमजान काळात जकातरूपी मिळणाऱ्या दानातून उर्वरित तीन महिने सुसह्य होत होते. या वेळी रमजान व बकरी ईद दोन्ही मुख्य सण कोरोना संसर्गामुळे साध्या पद्धतीने झाल्याने त्याचा मोठा फटका मदरशांना बसल्याचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी ‘सकाळ’ला सांगितले. गेल्या वर्षीदेखील मौलाना मुफ्ती यांनी पुढाकार घेऊन येथील व्यापारी तथा नगरसेवक नबी अहेमदुल्ला यांना मदरशांकडील चामडे खरेदी करण्यास सांगितले. त्यांनी बकरी ईद काळात मदरशांकडून १२ हजार चामडे खरेदी केले. या व्यवहारात ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील १५ मदरशांना कुर्बानीचे चामडे विक्रीतून ५० लाखांचा हातभार लागत होता. राज्यात प्रामुख्याने मालेगाव, औरंगाबाद, भिवंडी, परभणी, मराठवाडा, जळगाव, अक्कलकुवा, कोल्हापूर, सांगली या भागात मदरसे आहेत. दशकापूर्वी प्रामुख्याने मालेगावीच मदरसे होते. धार्मिक शिक्षण घेणारे सर्व जण मालेगावी मदरशांमध्ये शिक्षणासाठी येत. राज्यातील मदरशांमध्ये येथील शिक्षण घेतलेले तरुण होते. 

चामडा उद्योग दृष्टिक्षेपात 
० गोवंश हत्याबंदी व कोरोना संसर्गामुळे चामडे उद्योगाची पीछेहाट 
० चामडे उद्योगातील प्रमुख केंद्र असलेल्या कानपूरमधील पाचशे टेनरी बंद 
० देशातील चामडे उद्योगातील पीछेहाटीचा चीन, बांगलादेश, व्हिएतनाम, पाकिस्तानला फायदा 
० शहरात ईद काळात पंचवीस हजार चामड्यांची विक्री 
० चामडे वाहतूक, हमाली व मीठ असा प्रतिचामड्यासाठी किमान साठ रुपये खर्च 
० म्हशीच्या चामड्याचा सध्या फक्त १०० त ११० रुपये दर 
० चामड्यापासून हजारो वस्तूंची निर्मिती 
० चामडे पुरण्यासाठी महापालिकेने मैला डेपोवर खोदले १० खड्डे  

रिपोर्ट - प्रमोद सावंत 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com