Latest Marathi News | रामकुंड नव्हे, रामतीर्थ!; रामतीर्थाला वाहतूक कोंडीतून सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Such traffic jams happen here every day, no one has control over it.

Nashik : रामकुंड नव्हे, रामतीर्थ!; रामतीर्थाला वाहतूक कोंडीतून सोडवा

नाशिक : देशातील सात पवित्र नद्यांपैकी एक अन् बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने गोदावरी नदीचे तीर्थक्षेत्रीय महत्त्व आहे. त्यामुळे रामतीर्थावर राज्यासह परराज्यातील भाविकांची वर्षभर वर्दळ असते. मात्र इथे सकाळ व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली. त्यावर तोडगा काढण्यासाठी परिसरात पक्क्या स्वरूपातील बॅरिकेडिंगची गरज असल्याचे पुरोहित संघासह नित्यनेमाने धार्मिक विधींसाठी येणाऱ्यांनी व्यक्त केली. (Relieve Ramtirtha from traffic jams Nashik Latest Marathi News)

भगवान शंकरांनी पापक्षालनासाठी रामतीर्थात स्नान, तर प्रभू रामचंद्रांनी पिताश्री राजा दशरथ यांचे श्राद्ध घातल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. त्यामुळे रामतीर्थाचे महत्त्व देशभरात पोचले आहे. देशभरातील भाविक अस्थी विसर्जन व अन्य धार्मिक विधींसाठी नाशिकमध्ये येतात. तीर्थक्षेत्र यात्रेकरू, भाविक, पर्यटकांना वाहने उभी करण्यासाठी महापालिकेतर्फे म्हसोबा पटांगण, गौरी पटांगणावरील जागा निश्‍चित केली आहे.

तरीही सकाळी अनेक वाहने थेट रामतीर्थापर्यंत जातात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. रामतीर्थावर मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, नवीन शाहीमार्ग, सरदार चौक, दिल्ली दरवाजा, नवा दरवाजात या भागातून ही वाहने थेट रामतीर्थावर पोचतात. रामतीर्थासमोर सकाळी मोठ्या प्रमाणावर चारचाकींसह रिक्षा येतात. या चौकात मोठ्या संख्येने दुचाकी लावल्या जातात. रामतीर्थ परिसरात होणारी वाहतूक कोंडी कायमस्वरूपी टाळण्यासाठी रामतीर्थाकडे जाणाऱ्या चौकात बॅरिकेडिंग केल्यास या भागात चारचाकी वाहने येणार नाहीत. कपालेश्‍वर मंदिराजवळील चौकात वाहने आणण्यास मज्जाव केल्यास व त्यासाठी हा रस्ता बंदिस्त केल्यास वाहने याठिकाणी येणार नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल.

अतिक्रमणे वाढली

महापालिका पूररेषेतील बांधकामांना विरोध करते. दुसरीकडे रामतीर्थाजवळ मोठ्या प्रमाणावर पक्की बांधकामे उभी राहिली आहेत. याशिवाय अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रामतीर्थाकडे जाणारा रस्ता अधिक अरुंद झाला आहे. दरम्यान, गोदाघाटावर श्राद्धादी व अन्य विधींसाठी आलेल्या अभ्यागतांची वाहने गौरी, म्हसोबा, जुना भाजीबाजार पटांगणावर पार्क करावीत. ही वाहने रामतीर्थाकडे न आल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. त्यासाठी या वाहनांना सरदार चौकातील देवी मंदिराजवळ रामतीर्थाकडे जाण्यासाठी मज्जाव केल्यास ही कोंडी आपोआप सुटेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Nashik : न्यायाधिश तेजवंतसिंह संधू यांनी न्याय करता करता जुळविल्या संसाराच्या गाठी

रामतीर्थावर होणारे धार्मिक विधी

-अस्थी विसर्जन

-दशक्रिया विधी

-गंगा-गोदावरीपूजन

-तीर्थस्थान स्नान विधी

-एववस्त्री स्नानविधी

-कालसर्प शांती

-त्रिपिंडी

-नारायण नागबली

-तप्रण

-रुद्राभिषेक

-लघुरुद्राभिषेक

-हेमाद्री स्नान

"रामतीर्थाशेजारील व चतुःसंप्रदाय आखाड्याच्या खालील बाजूचे ‘पार्किंग’ ‘स्मार्ट’ कामामुळे बंद आहे. त्यामुळे रामतीर्थावर वाहतूक कोंडी होत आहे. बंद पोलिस चौकी पुन्हा कार्यान्वित व्हावी."

- गुरमित बग्गा, माजी उपमहापौर

"एकीकडे अनेकांना पूररेषेत बांधकामासाठी विरोध केला जातो. दुसरीकडे रामतीर्थ परिसरात सुरू असलेल्या व नदीपात्रालगत असलेली अनेक सिमेंट काँक्रीटची बांधकामे बिनबोभाट सुरू आहेत."-सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ

"रामतीर्थाजवळील जागा अरुंद आहे. याभागात श्राद्धादी विधींसाठी बारमाही गर्दी असते. त्यामुळे रामतीर्थाकडे जाणाऱ्या सर्वच प्रकराच्या वाहनांना मज्जाव करावा."

-पद्माकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा: Rajya Natya Spardha : ‘तांत्रिक’ अडथळ्याने उत्कंठावर्धक ‘इथर’ प्रेक्षकांपर्यंत पोचलेच नाही