esakal | रेमडेसिव्‍हिर वितरण : रांगा संपल्‍या, तरी नातेवाइकांची फरफट सुरूच!

बोलून बातमी शोधा

remdesivhir
रेमडेसिव्‍हिर वितरण : रांगा संपल्‍या, तरी नातेवाइकांची फरफट सुरूच!
sakal_logo
By
अरूण मलानी

नाशिक : राज्‍यातील अन्‍य जिल्ह्यांच्या तुलनेत अद्यापही नाशिकला अपेक्षित प्रमाणात रेमडेसिव्‍हिरचा पुरवठा होत नसून जिल्‍हा प्रशासन याप्रश्‍नी हतबल झाले आहे. अत्‍यावस्‍थ रुग्‍णांसाठी रुग्‍णालयांकडून मागणी नोंदविली जात असताना सूत्र जुळवून इंजेक्‍शन वितरित करुन निभावले जातेय. उपलब्‍धताच कमी असल्‍याने नियमावर बोट ठेवत तुवड्याचा राग रुग्‍णालयावर अर्थात, ‘वड्याचा राग वांग्‍यावर’ काढला जात असल्‍याची स्‍थिती आहे. इंजेक्‍शनसाठी रांगा संपल्‍या असल्या तरी रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची फरफट सुरूच आहे.

रेमडेसिव्‍हिर वितरणावेळी वड्याचा राग वांग्‍यावर

पुणे, ठाणे व अन्‍य मोठ्या शहरांमध्ये रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनच्‍या उपलब्‍धतेचा विचार केला, तर नाशिकला खूपच कमी उपलब्‍धता होत असल्‍याची जाणीव होते. राज्‍यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येच्‍या बाबतीत अव्वल शहरांच्‍या यादीत नाशिकचाही समावेश असताना आरोग्‍य सुविधा उपलब्‍धतेबाबत मात्र दुजाभाव होत असल्‍याची अनुभूती येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा गंभीर असताना दुसरीकडे रेमडेसिव्‍हिरदेखील उपलब्‍ध होत नसल्‍याने उपचारात अनेक अडथळे येत असल्‍याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. दोन कॅबिनेट मंत्री असूनही नाशिकचे असे हाल होत असल्‍याने संताप व्‍यक्‍त होत आहे.

संजीवनी नाही; पण गरज

रेमडेसिव्‍हिर वापराबाबत शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्‍यानुसार रुग्‍णालये आपल्‍याकडील अत्‍यावस्‍थ (एचआरसीटी स्‍कोर अधिक असलेले) रुग्‍णांकरिता मागणी नोंदवित आहेत. रेमडेसिव्‍हिर ही संजीवनी नसल्‍याचा युक्तिवाद केला जात असला तरी सध्या उपचाराकरिता आवश्‍यकता तर आहे, ही बाब मान्‍य करण्यास प्रशासकीय यंत्रणा तयार नसल्‍याचेही सध्याचे चित्र आहे. डॉक्‍टरांवर प्रचंड दबाव येत असल्‍याने आता प्रिस्‍क्रीप्‍शन लिहून देण्याऐवजी इंजेक्‍शनची उपलब्‍धता करण्यास नातेवाइकांना तोंडी कळविले जात आहे. यातून काळ्या बाजारातून इंजेक्‍शनची खरेदी करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढावत आहे. प्रशासकीय यंत्रणेची कटकट नको म्‍हणून अनेक रुग्‍ण रेमडेसिव्‍हिरबाबत तोंडावर बोट ठेवत आहेत. यामुळे रुग्‍णांचे मात्र हाल होत आहेत.

बेडची संख्या घटवत कमी वाटपाचा फॉम्‍युला

रुग्‍णांचा वैद्यकीय अहवाल व रुग्‍णालयातील खाटांची संख्या असे सूत्र इंजेक्‍शन वितरणावेळी लावले जाते. अशात रुग्‍णालयातील खाटांची संख्याच कागदोपत्री घटवून त्‍या प्रमाणात तोकडे इंजेक्‍शन उपलब्‍ध करून देण्याचा नवा फॉम्‍युला सध्या अवलंबला जात आहे.

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

डॉ. पवार वैद्यकीय रुग्‍णालयाला पंधरा दिवसांत नऊ दिवस भोपळा

वितरण प्रणालीत बड्या रुग्‍णालयांना झुकते माप दिले जात असल्‍याचे जाणवत आहे. जिल्ह्यातील मोठ्या कोविड रुग्‍णालयांपैकी एक असलेल्‍या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालयाला पंधरा दिवसांपैकी नऊ दिवस तब्‍बल एकही इंजेक्‍शन वाटप केले गेले नाही. येथे एचआरसीटी स्‍कोर दहापेक्षा अधिक असलेले ११५ रुग्‍ण ऑक्‍सिजन बेडवर, तर ३५ रुग्‍ण व्‍हेंटिलेटरवर आहेत. अशात पंधरा दिवसांत चारशेपेक्षा कमी व्‍हायल रुग्‍णालयास उपलब्‍ध झाल्‍याचे अहवालातून स्‍पष्ट होते. गेल्‍या २५ एप्रिलला मालेगावच्‍या दोन रुग्‍णालयांनी प्रत्‍येकी १८ व १७ इंजेक्‍शनची मागणी केली असता त्‍यांनाही एकही इंजेक्‍शन वितरित केले गेले नाही.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

गेल्‍या सहा दिवसांतील रेमडेसिव्‍हिरचे वाटप

२३ एप्रिल---------७१४

२४ एप्रिल---------५५८

२५ एप्रिल---------४४५

२६ एप्रिल----------४९४

२७ एप्रिल---------७००

२८ एप्रिल---------१३३०