
Republic Day Chitrarath : शक्तिपिठांच्या चित्ररथाची वणी गावात शोभायात्रा!
वणी (जि. नाशिक) : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन झालेल्या चित्ररथाची गुरूवारी (ता. १६) श्रीक्षेत्र वणी शहरात हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थित शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) सप्तशृंग गडावर आदिमायेच्या दरबारात चित्ररथाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. (Republic Day Chitrarath of Shaktipitha procession to Vani village nashik news)

आदिशक्ती पीठाच्या चित्ररथाची निघालेली शोभायात्रा.
राज्यातील साडेतीन पिठांच्या ठिकाणी स्थानिक नागरिक व भाविकांना दर्शन व्हावे, यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुटीवार यांनी सादरीकरणाचे नियोजन केले होते. तीन दिवसांपूर्वी हा चित्ररथ माहूरहून वणी येथे पोहचला.
वणी येथील खंडेराव महाराज मंदिर मैदानावर दोन दिवस चित्ररथाचे सुशोभिकरण केल्यानंतर गुरूवारी सकाळी दहाला गावातून शोभायात्रा काढण्यात आली. सुरवातीला दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार व वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी या चित्ररथाची पुजा केली.
खंडेराव मंदिर, बसस्थानक, वणी पोलीस ठाणे, कॉलेज रस्त्यावरुन हा चित्ररथ ग्रामपंचायतसमोर आल्यावर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून शोभायात्रेची सांगता झाली. ग्रामस्थांनी चित्ररथाचे जल्लोषात स्वागत केले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

किसनलालजी बोरा स्कुल, के. आर. टी. हायस्कूल, संताजी स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थांनी या वेळी पारंपारीक नृत्य, आदिवासी नृत्य सादर केले. लेझीम पथकाचाही यात सहभाग होता. संयोजक जयेश खोट यांचा श्री. बोडखे, सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड, महेंद्र बोरा, महेंद्र पारख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्थानिक चित्ररथ समितीचे दर्शन दायमा, पियुष भवर, भास्कर पाटील, चेतन कुऱ्हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयुर जैन, सतिश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांबेरे, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, आबा मोर, श्रीकांत ठाकूर आदींसह सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी संयोजन केले.