धक्कादायक! जन्मदात्रीच निघाली वैरिण; बनाव रचला पण... | Nashik Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

Nashik Crime News: धक्कादायक! जन्मदात्रीच निघाली वैरिण; बनाव रचला पण...

नाशिक : अवघ्या चार महिन्यांची धृवांशी. तिला जग पहायचे होते. तिला अजून आपलं कोण, परकं कोण याचीही समज नव्हती. धृवांशी तिच्या वडील अन्‌ आजीकडेच जास्तवेळ राहते. त्यांच्याकडे पाहून हसतेही.

मी आई असून ती माझ्याकडे राहत नाही. माझ्याकडे पाहून हसत नाही, याच मत्सरातून धृवांशीचा गळा घरातील चाकूने चिरल्याची कबुली उच्चशिक्षित आईनेच पोलिसांना दिली. बीएसस्सी (केमिस्ट्री) पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या युक्ता रोकडे (२६) हिला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, युक्तानेच चिमुकली धृवांशीचा अज्ञात महिलेने गळा चिरून मारल्याचा खोटा बनाव रचला होता. मात्र पोलिस चौकशीमध्ये जन्मदात्रीच वैरिण निघाली. (revealed mother killed her own child murder case of 4 month old daughter Nashik Crime News)

धृवांशी भूषण रोकडे (वय ४ महिने, रा. फ्लॅट नं १, ध्रुवनगर योगा हॉलसमोर, गंगापूर शिवार) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असलेले रोकडे कुटूंबिय ध्रुवनगरमध्ये राहतात. भूषण यांचा संशयित युक्ता हिच्याशी दुसरा विवाह आहे.

गेल्या सोमवारी (ता. २०) सायंकाळी युक्ताची सासू दूध घेण्यासाठी घराबाहेर गेल्या असता, ती संधी साधून संशयित युक्ता हिने तीन महिन्यांची धृवांशी हिच्या गळ्यावर किचनमधून चाकूने वार करून चिरून खून केला. त्यानंतर तिने बेशुद्ध होण्याचे नाटक केले.

सदरची बाब दीराच्या लक्षात आल्यानंतर संशयित युक्ताने अज्ञात महिलेने आपल्याला बेशुद्ध केले आणि मुलीचा खून केल्याचा दावा केला. पोलिस घटनास्थळी आल्यानंतरही युक्ताने तीच कहानी सांगितली. परंतु पोलिसांनी तिच्याकडे वारंवार चौकशी केली असता, तिच्या बोलण्यात तफावत आढळून आली.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

तसेच, युक्ताने वर्णन केल्याप्रमाणे संशयित महिलेचा परिसरात शोधही पोलिसांनी घेतला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यातही संशयित महिला आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादी युक्ताकडेच तपासाची दिशा फिरविली आणि कसून चौकशी केल्यानंतर संशयित युक्ताने गुन्ह्याची कबुली दिली.

वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख, शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार, गणेश शिंदे, महेश येसेकर, उपनिरीक्षक सचिन शेंडकर, पोलीस नाईक रवींद्र मोहिते, गणेश रहेरे, मधुकर सहाणे, मिलिंद परदेशी, संदीप पवार, नवले यांनी या क्लिष्ट गुन्ह्याची शिताफीने उकल केली.

"निष्पाप चिमुकली धृवांशीचा गळा चिरताना उच्चशिक्षित असलेल्या आईचा जराही हात थरथरला नाही. तिने नियोजनपूर्वक ही हत्या केली आहे. ती मानसिकदृष्ट्या सक्षम असून धृवांशीच्या जन्मापूर्वी तिचे दोन गर्भपात झाल्याचेही समोर आले आहे. तिची मेडिकल चाचणी केली असून मानसोपचार तज्ज्ञांकडूनही तपासणी केली जाईल."

- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.