
Jalgaon Crime News : कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; रामदेववाडीजवळ टायर फुटल्याने अपघात
जळगाव : जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडीजवळ सुसाट कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकऱ्याचा (Farmer) मृत्यू झाला.
अपघातानंतर तरुणांनी मदतीला धाव घेतली अन् स्वतःच्या पित्याचा मृतदेह बघून मुलाने आक्रोश करत हंबरडा फोडला. (2 wheeler farmer died in a collision with car near Ramdevwadi jalgaon crime news)
रमेश मदन राठोड (वय ४५, रा. रामदेववाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कारचालकाला वाहनासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पाचोऱ्याकडून जळगावकडे येत असलेल्या कार (एमएच १९, डीव्ही ७५१३) पुढे चालत असलेल्या दुचाकीस्वाराने (एमएच १९, डीझेड १६६०) गाव येण्यापूर्वीच युटर्न घेतला अन् ब्रेक मारतानाच कारचे टायर फटून अनियंत्रित कार दुचाकीवर आदळली.
या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी रमेश मदन राठेाड (वय ४५) दुचाकीसह फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
मदतीला धावून आला मुलगा
अपघाताची माहिती ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. गावाबाहेर उभे असलेल्या तरुणांनी मदतीसाठी घटनास्थळ गाठले. त्या तरुणांपैकी एक मृताचा मुलगा होता. ग्रामस्थांनी कारचालकाला ताब्यात घेतले. पोलिस नाईक स्वप्नील पाटील, प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
ब्रेक मारताच फुटला टायर की...
कॉंक्रिटमुळे रोड तापून टायर फुटला अन् अपघात घडला, की चालकाकडून कार नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात टायरचा स्फोट झाला, हे पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे.
सिमेंट रोडमुळे अपघाती मृत्युमध्ये वाढ
जळगाव-पाचोरा रोडचे वर्षभरापूर्वीच काँक्रिटीकरण झाले आहे. पाचोरा-जळगावदरम्यान या रस्त्यावर जवळपास ५० किलोमीटरमध्ये ७२ टर्न (वळण) आहेत. सर्वच वळणावर अपघात वाढले आहेत.
रामदेववाडी गावातून जात असलेल्या या मार्गावर गावाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काँक्रिट रस्ता असल्याने चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे.