esakal | सावधान! मोबाईलवर गाडी नंबर सर्च करून वाहनधारकांची लूट; महामार्गावरील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

social media appeal

सावधान! मोबाईलवर गाडी नंबर सर्च करून वाहनधारकांची लूट; महामार्गावरील प्रकार

sakal_logo
By
टीम सकाळ

नाशिक : मोबाईलच्या माध्यमातून वाहन क्रमांक सर्च करून वाहनधारकांची लूट केल्याचा प्रकार सध्या महामार्गावर सुरू आहे. वाहनधारकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांकडून दिला जात आहे. या आशयाचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

वाहनाचा क्रमांक सर्च करून वाहनधारकांची लूट

महामार्गावर वाहनधारकांची लूट करण्याचा नवीन फंडा अमलात आणला जात आहे. मोबाईलच्या माध्यमातून चालत्या वाहनाचा क्रमांक सर्च करून वाहनधारकांची माहिती काढली जाते. त्यानंतर वाहनाचा माग काढून वाहनमालकाला त्याच्या नावाने आवाज देत वाहन थांबविण्याची विनंती केली जाते. संबंधित व्यक्तीस परिचित असल्याचा भास होऊन वाहनचालक त्यांचे वाहन थांबवून संबंधित संशयितांची चर्चा करतात. यादरम्यान संशयित महामार्गावर कुणी नसल्याची संधी साधत त्या वाहनधारकांची लूट करतात. प्रतिकार केला असता, मारहाण केली जाते. असे अनेक प्रकार घडल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी राहत नाही.

हेही वाचा: शिवसेना व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांकडून महामार्गावर गस्त

रस्त्यांवर शुकशुकाट आहे. याची संधी साधत संशयित रस्त्यावर उभे राहून रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा क्रमांक मोबाईलमध्ये असलेल्या तांत्रिक प्रणालीतून सर्च करतात. त्या आधारित संशयितांना संबंधित वाहनमालकांचा पत्ता, वाहनाची तांत्रिक माहिती सर्व प्राप्त होते. त्या माहितीचा वापर करत सर्च केलेले वाहन काही अंतर दूर जाताच संशयित त्यांच्या वाहनाने संबंधित वाहनाचा पाठलाग करत वाहनमालकाच्या नावाने आवाज देतात. वाहनचालक थांबताच त्यांची लूट केली जाते. अशा प्रकारांना आळा बसावा. यासाठी पोलिसांकडून महामार्गावर गस्त वाढविण्यात आली आहे.

पोलिसांचा संदेश

वाहनधारकांनी सावधान राहावे, मागून येणाऱ्या वाहनचालकांनी आवाज दिल्यास वाहन थांबवू नये. अशा आशयाचे पोलिस विभागाचे चिन्ह असलेला संदेश सोशल मीडियावर प्रसारिता होत आहे. असे संदेश सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा: अचूक वीजबिल हवंय? कोरोना काळात महावितरणची विशेष सुविधा