नाशिकमध्ये होणार राजकीय उलथापालथ! वसंत गिते, सुनील बागूल शिवसेनेत? संजय राऊतांचा नाशिक दौरा चर्चेत

sanjay raut bjp.jpg
sanjay raut bjp.jpg

नाशिक : शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत गुरुवारी (ता. ७) व शुक्रवारी (ता. ८) नाशिक दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. हे दोन नेते वसंत गिते व सुनील बागूल असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगून भाजपला चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमके कोणते नेते संपर्कात आहेत, याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. 

संजय राऊत करणार भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांशी चर्चा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिवसेनेत द्वंद सुरू झाले आहे. महाविकास आघाडीत भाजपकडून शिवसेनेला रोज टार्गेट केले जात आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना ‘ईडी’च्या नोटिसा पाठवून बेजार केले जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून सत्तेच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीकडून भाजपच्या नेत्यांना पक्षात खेचण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या वर्षअखेर एकनाथ खडसे यांना घेऊन ‘राष्ट्रवादी’ने भाजपला मोठा दणका दिला होता. भाजपविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी या शह-काटशहाचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन प्रदेशाध्यक्ष पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या दोन उपाध्यक्षांमध्ये वसंत गिते व सुनील बागूल यांची नावे आघाडीवर आहेत.

संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण 

गिते यांनी १ जानेवारीला मिसळ पार्टी दिली. मिसळ पार्टीतून मित्रांचा गोतावळा एकत्र करण्याबरोबरच ताकद दाखविण्याचा एक भाग होता. गिते यांची मिसळ पार्टी यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले. गिते व बागूल दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, पक्षात त्यांना मोठी पदे मिळाली. मध्यंतरीच्या काळात वैचारिक मतभेद झाल्यानंतर दोघांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. गिते मनसे व आता भाजपमध्ये आहेत, तर श्री. बागूल पहिल्यांदा राष्ट्रवादी व आता भाजपमध्ये आहेत. दोघेही पक्षात नाराज असून, दोघांचाही कल शिवसेनेकडे असल्याचे बोलले जात आहे. त्यात दोघेही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, श्री. गिते यांनी आपण भाजपमध्ये समाधानी असून, पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले, तर श्री. बागूल यांनी गुरुवारी सुरतला कौटुंबिक कार्यक्रमासाठी जाणार असून, मी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले. 
 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला
गुरुवारी राऊत नाशिकमध्ये 
खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिकमध्ये येणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. या दौऱ्यात ते भाजपला शह देण्यासाठी भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांशी शिवसेना पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. ते कुठल्या भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत, याबाबत माहिती नसल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. मात्र, भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. भाजपचे नेते शिवसेनेत प्रवेश करतील किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, चर्चेच्या माध्यमातून शिवसेनेकडून भाजपला चुचकारून संभ्रम निर्माण करण्याची खेळी खेळली जात असल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com