
Sanjay Raut Press Conference | काहीही झाले, तरी आमचे नेते उद्धव ठाकरेच : संजय राऊत
नाशिक : आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा, तुरुंगात टाका, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान आहे, तर उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, सदैव राहतील, बाकी सर्व हा औटघटकेचा खेळ असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. २२) नाशिकमध्ये केली. (Sanjay Raut Press Conference statement our leader Uddhav Thackeray nashik political news)
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंडाला आपल्या नावाची सुपारी दिल्याचा आरोप खासदार राऊत यांनी मुंबईत केला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलिस आयुक्तांना त्यांनी पत्र दिले.
त्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील पोलिस पथकाने नाशिकमध्ये खासदार राऊत यांची भेट घेऊन जबाब नोंदविला. श्री. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की काही माहिती व घटना माझ्या कानावर आली.
ती संबंधित यंत्रणेला कळविली आहे. आता त्यांचे काम ते करतील, माझ्या बाजूने विषय संपला आहे. गुंडांवर मी बोलत नाही. आता पोलिस त्यांचे काम करतील. जन्मठेप व खंडणीचे आरोप असलेल्या गुंडांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आणि त्यांच्या पुत्रांबरोबर असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री यांच्याबद्दल आपण अपशब्द वापरला नाही. अमित शहा यांनी आमच्या नेत्याबाबत अपशब्द वापरला. त्यामुळे त्याच भाषेत आपण उत्तर दिले. त्यामुळे अमित शहा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी खासदार राऊत यांना पत्र लिहित काही सल्ले दिले. त्या अनुषंगाने कोण संदीप देशपांडे? असा सवाल राऊत यांनी करताना मनसे हा पक्ष माझ्या खिजगणतीत देखील नसल्याचे सांगितले.
‘ते’ आता वेगळे झालेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यात आल्याच्या प्रश्नावर बोलताना शिंदे गट किंवा मिंधे गट आता वेगळे झाले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर विशेष मेहरबानी केली आहे.
त्यांचे ते पाहतील, त्यांच्या कार्यकारिणीशी आम्हाला काही घेणे नाही. आम्ही, आमचा पक्ष, उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आमचे प्रेरणास्थान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधी आशीर्वाद दिले आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी केला.
ठाणे पोलिसांनी घेतला जबाब
नाशिक : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्तांना तसे पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत ठाणे पोलिसांच्या पथकाने नाशिकमध्ये येत राऊत यांचा सहापानी जबाब नोंदवून घेतला.
जबाबानुसार चौकशी केली जाणार असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. वर्तकनगर विभागाचे सहायक आयुक्त गजानन काब्दुले व गुन्हे शाखेकडील खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्यासह पथकाने बुधवारी (ता. २२) सकाळी खासदार राऊत थांबलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली.
त्यानंतर राऊत यांचा सहा पानांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. द्याप पुरावे उपलब्ध नसल्याने मिळालेल्या जबाबाच्या सहाय्याने तपास सुरू असल्यचे सांगत अधिक माहिती देणे ठाणे पोलिसांनी टाळले. दरम्यान मात्र नाशिक शहर पोलिसांनी खासदार राऊत यांच्या सुरक्षेत कोणतीही वाढ केली नसल्याचे सांगत, प्रोटोकॉलनुसार बंदोबस्त असल्याचे सांगितले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
‘ती’ पवारांची राजकीय खेळी
सिन्नर : पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला शरद पवार यांच्या बाबतीतला गौप्यस्फोट ही खुद्द शरद पवार यांचीच त्या वेळची राजकीय खेळी असावी, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.‘ तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेणे हे आव्हानात्मक होते.
कदाचित महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे शिफारस करताना बहुमताची यादी दिली गेली असती, तर राजकीय कल्लोळात राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण वर्षभर लांबवले असते. त्यामुळेच राजकीय खेळीचा भाग म्हणून दस्तूरखुद्द शरद पवार यांनी फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापनेचा घाट घातला असेल, तर त्याबाबत मी माझे मत देणार नाही.
परंतु पहाटेच्या वेळी घेतलेल्या त्या शपथविधीमुळे महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग सोपा झाला. निऱ्हाळे येथे बुवाजी बाबा देवस्थानच्या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार राऊत यांनी हा खुलासा केला.