राजवंश भारती : स्वत: राजा नसलेला सर्वश्रेष्ठ यदुवंशी... श्रीकृष्ण !

कुरुक्षेत्राच्या महायुद्धानंतर भारतातील सगळ्याच मोठ्या राजसत्ता दुर्बल झाल्या होत्या. बलाढ्य यादवांना कोणी प्रतिस्पर्धीच उरला नव्हता. त्यांचा नाश ते स्वत:च करणार, हे अटळ भविष्य होतं.
shri krishna & Arjun
shri krishna & Arjunesakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

चंद्रवंशीय राजा ययातीला देवयानी व शर्मिष्ठा यांच्यापासून एकूण पाच मुलगे होते. यदू, तुर्वसू, द्रह्यू, अनू आणि पुरू. प्रचलित कथेनुसार ययातीला अकाली वार्धक्य आले आणि ते वार्धक्य स्वीकारण्यासाठी त्याने आपल्या मुलांना विचारणा केली.

तेव्हा केवळ पुरूने ते स्वीकारले. बाकीच्यांनी नकार दिला. यात प्रथम नकार ज्येष्ठ पुत्र यदूने दिला. यामुळे संतापून ययातीने त्याला वंशातून वाळीत टाकले. यापुढे तो चंद्रवंशाचा वारस नाही, असे त्याने जाहीर केले.

यदूने स्वाभिमानाने ही शिक्षा स्वीकारली. त्यानेही चंद्रवंशाचे नाव त्यागले. त्याने आपली वेगळी वंशशाखा घोषित केली. त्याच्या नावावरून त्या शाखेला ‘यदुवंश’ हे नाव मिळाले. हेच इतर तिघांबाबतही घडले. त्यामुळे आता चंद्रवंश वा सोमवंश हा केवळ पुरूच्या वंशजांचा राहिला. (saptarang latest marathi article by adv sushil atre on Rajvansh Bharti best Yaduvanshi Shri Krishna nashik news)

वंशाचे नाव दिले नसले, तरी ययातीने आपले राज्य या पाच मुलांना वाटून दिले. पैकी तुर्वसू, द्रह्यू व अनू यांनी हळूहळू दूरवरच्या प्रदेशात आपली राज्ये वाढविली. ते भारतापासून लांब गेले. भारतवर्षात मुख्यत्वे पुरू आणि यदू यांचेच वंश वाढले.

यदूने आज्ञा दिली, की त्याच्या वंशाला यदुवंश किंवा यादव वंश हे नाव असेल. इतर वंशांप्रमाणे या यादव वंशाच्याही काही शाखा-उपशाखा तयार झाल्या.

त्यांच्यापैकी काही समांतर वंश म्हणजे हैहय, क्रोष्ट, चेदी, वृष्णी, भोज, अंधक, विदर्भ, अहिर तसेच कुकुर. वेगवेगळ्या कालखंडात हे वंश सुरू झाले. प्रत्येक वंशाच्या नावापुढे ‘यादव’ हा उल्लेख केला जातो.

जसे ‘वृष्णी यादव’. प्रत्येक वंश- उपवंशात काही राजे अत्यंत प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान होऊन गेले. त्यांची कर्मभूमी वेगवेगळी, त्यांची राजधानीही वेगळी होती.

यदूला चार मुलगे होते. सहस्रजित, क्रोष्ट, नल आणि रिपू. यापैकी सहस्रजिताचा नातू हैहय याच्या नावाने तो वंश ‘हैहय वंश’ या नावे ओळखला जातो. त्याचा वंशज महिष्मान याने हैहयांची राजधानी नर्मदाकाठी वसविली- महिष्मती!

याच वंशात पुढे कार्तवीर्य अर्जुन किंवा सहस्रार्जुन हा प्रचंड पराक्रमी राजा झाला. याने एकदा रावणालाही बंदी बनविले होते. तो दत्तात्रेयांचा निस्सीम भक्त होता. आपल्याला हे माहिती आहेच, की सहस्रार्जुनाचा वध परशुरामाने केला आणि पित्याच्या हत्येचा सूड घेतला.

shri krishna & Arjun
भावना यंत्राच्या ताब्यात!

हैहयांप्रमाणे दुसरा यादव वंश यदुपुत्र क्रोष्ट/क्रोष्टू याचा आहे. या क्रोष्ट वंशात शशबिंदू हा पराक्रमी राजा झाला. त्याच्या काही पिढ्यांनंतर सात्वत्त हा राजा झाला. हा श्रीरामांचा समकालीन राजा आहे.

अंधक, भोज आणि वृष्णी हे याचेच मुलगे. या तिघांच्याही नावाने त्यांचे स्वतंत्र वंश ओळखले जातात. ‘वृष्णी’ या वंशातील एक राजा ‘विदर्भ’ याने त्याच्याच नावाचे एक स्वतंत्र राज्य स्थापले. ते आजही ‘विदर्भ’च आहे.

कौंडिण्यपूर ही त्याची राजधानी होती. विदर्भ राजाचा एक मुलगा रोमपाद याचा वंशज ‘चेदी’ यानेही आपले स्वतंत्र राज्य स्थापले आणि वेगळा वंश सुरू केला. ‘शंभर अपराध’वाला शिशुपाल याच चेदी वंशातील होता.

यादवांपैकी वृष्णी यादव अधिक महत्त्वाचे आहेत, कारण भगवान श्रीकृष्ण याच वंशात जन्मले. वृष्णीचा वंशज, मथुरेचा राजा शूरसेन याचा मुलगा वसुदेव आणि मुलगी पृथा. पृथा पुढे शूरसेनाचा भाऊ कुंतीभोज याला दत्तक गेली आणि ‘कुंती’ पांडवमाता म्हणून प्रसिद्ध झाली.

वसुदेव-देवकी यांचा आठवा मुलगा श्रीकृष्ण; तर वसुदेव-रोहिणी यांचा मुलगा बलराम. कंसाचा पिता उग्रसेन आणि देवकीचा पिता देवक हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांचे वडील म्हणजे राजा आहुक. तर, वसुदेवाचा चुलत भाऊ म्हणजे कृष्णाचा सांभाळ करणारा गोकुळचा ‘नंद’.

या आहुक आणि नंदाच्या वंशजांना ‘अहिर यादव’ म्हणतात. मूळ संस्कृत शब्द ‘अभीर’चा तो अपभ्रंश आहे. अहिर हा मुळात गोपालक समाज होता. त्यांचे इतर यादवांशी फारसे सख्य नसले, तरी ते श्रीकृष्णाला फार मानत होते.

shri krishna & Arjun
ज्योती झाली ज्वाला!

श्रीराम आणि श्रीकृष्ण हा भारतीयांचा श्वास व उच्छवास आहेत, असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. रामामुळे सूर्यवंश अमर, तर कृष्णामुळे यदुवंश अमर झाला. फरक असा, की श्रीराम हा सूर्यवंशी ‘राजा’ होता, तर श्रीकृष्ण हा यदुवंशी होता; पण राजा कधीच नव्हता.

अगदी सहज शक्य असूनही तो कधीही सिंहासनावर राजा म्हणून आरूढ झाला नाही. कंसाचा वध केल्यावर त्याने महाराज उग्रसेनालाच पुन्हा गादीवर बसविले. आणि मथुरेला अखेरपर्यंत उग्रसेनच राजा होता.

द्वारकेला आल्यावरही अधिकृत यादवप्रमुख आधी वसुदेव व नंतर ‘बलराम’ होता, श्रीकृष्ण नव्हे! आजच्या भाषेत सांगायचे तर श्रीकृष्ण नेहमीच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहिला. लक्षणीय गोष्ट म्हणजे यादव वंश कीर्तिशिखरावर पोहोचला तो श्रीकृष्णाच्या काळात आणि नष्ट झाला तोही श्रीकृष्णाच्याच समोर.

महाभारत युद्धानंतर ३६ वर्षांनी ‘प्रभासक्षेत्र’ या ठिकाणी वृष्णी, अंधक, भोज हे सगळे यादव आपसांत भांडून आणि लढून मृत्युमुखी पडले. प्रत्यक्ष श्रीकृष्ण व बलराम यांची मुलेही मृत्युमुखी पडली. तो गांधारीचा शाप होता म्हणतात. श्रीकृष्णाने तो यादव वंशच्छेद उदासीन वृत्तीने पाहिला आणि एका साध्या पारध्याचा बाण लागून देह ठेवला. पाठोपाठ बलरामानेही समाधी घेतली.

कुरुक्षेत्राच्या महायुद्धानंतर भारतातील सगळ्याच मोठ्या राजसत्ता दुर्बल झाल्या होत्या. बलाढ्य यादवांना कोणी प्रतिस्पर्धीच उरला नव्हता. त्यांचा नाश ते स्वत:च करणार, हे अटळ भविष्य होतं. ते कृष्णाने ओळखलं आणि स्वीकारलं. त्याने त्यात कुठलाही हस्तक्षेप केला नाही.

परिणामी, सर्व यादव कुळे जवळजवळ नष्ट झाली आणि सोन्याची द्वारकानगरीही समुद्रात बुडाली. या घटनेनंतर यदुवंश बराच काळ जणू काळाच्या पडद्याआड गेला. मधल्या कालखंडात कोण यादव राजे झाले, कोण नाही, याची इतिहासाने दखल घेतलेली नाही.

बऱ्याच काळानंतर बाराव्या शतकात देवगिरीला यादव राज्याचा पुन्हा उदय झाला. पण, तो अर्वाचीन- उत्तरकालीन यादव वंश आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊ.

shri krishna & Arjun
बोलू ऐसे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com