
नाशिक : रस्त्यात पडलेले साडेसहा लाख रुपये तासाभराच्या आत शोधून पोलिसांनी तक्रारदाराला मिळवून दिले. सरकारवाडा पोलिसांनी ही कामगिरी केली. गुरुवारी (ता.९) दुपारी एकला सीए उल्हास बोरसे आणि जयेश देसले यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे गणेशचंद्र पिंगळे हे ऑफिसमध्ये जमा झालेले सहा लाख ६८ हजार रुपये सीबीएस परिसरात असलेल्या जळगाव जनता सहकारी बँक येथे जमा करण्यासाठी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी पहिले महापौर निवासस्थान (रामायण) समोर सीए तुषार पगार यांच्या ऑफिसमधून चेक घेण्यासाठी गेले.
या वेळी त्यांनी चेक पैसे ठेवलेल्या बॅगेत ठेवले. परंतु, गडबडीत पिंगळे बॅगेची चैन लावण्यास विसरले. पगार यांच्या ऑफिसमधून दुचाकीवर ते निघाले असता, रामायण बंगल्याचे समोर पाठीवरील बॅगची चैन उघडी असल्याचे कळताच त्यांनी चैन लावण्यासाठी बॅग हातात घेतली. त्यांना पैसे असलेली लाल पिशवी मिळून आली नाही. यामुळे त्यांनी तत्काळ परिसरात पिशवीची शोध घेतला, मात्र त्यांना पिशवी सापडली नाही.
त्यांनी तातडीने घटनेची माहिती उल्हास बोरसे आणि जयेश देसले यांनी देत सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. रक्कम मोठी असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनीदेखील तत्काळ तक्रारीची गंभीर दखल तपासाची चक्रे फिरवून गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलिस नाईक संतोष लोंढे, रवींद्र लिलके, योगेश वायकंडे आणि रोहन कहांडळ यांना शोध घेण्यास पाठविले.
त्यानंतर पिंगळे ज्याप्रमाणे दुचाकीवरून कामानिमित्त गेले.त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पैशांची पिशवी ही तुषार पगार यांच्या ऑफिसजवळ रामायण बंगल्याचे समोर पडल्याचे त्यांना दिसले. सदर प्लॅस्टिकची पिशवी एक व्यक्ती उचलत असताना दिसले.
या व्यक्तीबाबत अधिक माहिती काढली असता ती आश्विनकुमार आगळे असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तत्काळ त्यांचा शोध घेत त्यांना संपर्क साधत त्यांच्याकडे पैशांबाबत विचारणा केली. यावेळी श्री. आगळे यांनीदेखील प्रामाणिकपणा दाखवीत पैसे सापडल्याचे कबूल करत संपूर्ण रक्कम ही तत्काळ सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सीए उल्हास बोरसे, जयेश देसले, गणेशचंद्र पिंगळे यांनी पोलिस दलाचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.