
Scholarship Exam: बुद्धिमत्ता, गणिताच्या प्रश्नांना लागली कसोटी! 97 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची हजेरी
नाशिक : नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी (ता. १२) नाशिक शहरास जिल्ह्यात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३५१ केंद्रांवर आठवी आणि पाचवीचे मिळून ४७ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपस्थितीचे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांहून अधिक राहिले.
बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित विषयाच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांची चांगलीच कसोटी घेतली. (Scholarship Exam Intelligence Math Questions Tested More than 97 percent student attendance nashk news)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत झालेल्या या परीक्षेत सकाळच्या सत्रात अकरा ते दुपारी साडेबारा, या वेळेत प्रथम भाषा आणि गणित विषयावर आधारित पहिला पेपर दीडशे गुणांसाठी घेतला.
दुपारच्या सत्रात दोन ते साडेतीन या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर आधारित दीडशे गुणांसाठीचा पेपर क्रमांक दोन पार पडला. यापैकी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित विषयाचे प्रश्न सोडविताना बहुतांश विद्यार्थ्यांचा कस लागला होता.
अनेक विद्यार्थी अखेरच्या मिनिटापर्यंत प्रश्नपत्रिका सोडवत होते. ही शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, ऊर्दू, इंग्रजी या तीन माध्यमांकरिता प्रश्नपत्रिका बहुसंची पद्धतीने घेण्यात आली.
परीक्षा कामकाजासाठी जिल्हा समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांनी काम पाहिले. जिल्ह्यात ३५१ परीक्षा केंद्रांवर ३५१ केंद्रसंचालक, आठ उपकेंद्रसंचालक, दोन हजार ४६० पर्यवेक्षक आणि ६५६ शिपाई यांची नियुक्ती केली होती. उपशिक्षणाधिकारी एस. एन. झोले व विस्ताराधिकारी सी. बी. गवळी यांनी जिल्हा परीक्षा नियंत्रण कक्षाचे कामकाज पाहिले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
पात्रतेनुसार गुणवत्तायादी
या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केले नाही. विद्यार्थ्यांना पात्र किंवा अपात्र असे घोषित केले जाईल. प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरतील. पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्तायादी जाहीर केली जाणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेची क्षेत्रनिहाय आकडेवारी अशी -
नाशिक जिल्हा
परीक्षा केंद्रसंख्या प्रविष्ट विद्यार्थी परीक्षेस उपस्थित विद्यार्थी
इयत्ता पाचवी १८९ २७ हजार ४०२ २६ हजार ७०५
इयत्ता आठवी १६२ २१ हजार ७८३ २१ हजार २६५
*नाशिक महापालिका क्षेत्र*
इयत्ता पाचवी ३३ सहा हजार ८५७ सहा हजार ५८९
इयत्ता आठवी २९ पाच हजार ३५० पाच हजार १४२
*मालेगाव महापालिका क्षेत्र*
इयत्ता पाचवी १५ एक हजार ९५८ एक हजार ९१५
इयत्ता आठवी ११ एक हजार ५०३ एक हजार ४८१