Subsidy on Milch Animals: दुधाळ जनावरे खरेदी अनुदानात दुपटीने वाढ! जाणुन घ्या लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milch animal

Subsidy on Milch Animals: दुधाळ जनावरे खरेदी अनुदानात दुपटीने वाढ! जाणुन घ्या लाभ

सिन्नर (जि. नाशिक) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गाय, म्हैस या दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किमती बघता ४० हजारांपर्यंत दिल्या जाणाऱ्या अनुदानात गायीकरिता ७०, तर म्हैस खरेदीसाठी ८० हजारांची वाढ करण्यात आली आहे. (Double increase in subsidy for purchase of milch animals State Cabinet Decisions nashik news)

सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत यापूर्वी दुधाळ गायीची खरेदी किंमत ४० हजार रुपये होती.

यात बदल करून ती आता ७० हजार रुपये करण्यात आली आहे. तर म्हशीची किंमतही ४० हजारांवरून ८० हजार करण्यात आली. पुढील वित्तीय वर्षापासून या सुधारित दराने अनुदान वितरित होणार आहे.

नव्या निर्णयानुसार राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सहा किंवा चार किंवा दोन दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना केवळ दोन दुधाळ देशी किंवा संकरित गायी किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करण्यात येईल. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे.

एकीकडे जनावरे खरेदी दरात वाढ केलेली असताना गोठा बांधकाम, कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा, खाद्य साठवणूक शेड बांधकाम या बाबींसाठी देय असलेले अनुदान रद्द होणार आहे. वरील बाबींसाठी रद्द करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीस जनावरे खरेदी वाढीव अनुदानाच्या रुपात देण्यात येईल.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांच्या किमतीस अनुसरून तीन वर्षांसाठी विमा उतरविणे संबंधित शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना एकदिवसीय प्रशिक्षण सत्र पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षणासाठी प्रतिलाभार्थीस ५०० रुपये शासनाकडून देण्यात येतील.

सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान

नावीन्यपूर्ण सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकातील लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते. तर सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येते.

दुपटीने वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा

पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पशुसंवर्धन विभागातर्फे ३१ जानेवारीला मंत्रिमंडळ बैठकीत दुधाळ जनावरांच्या खरेदी अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

जनावरांचे बाजार मूल्य वाढले असून, त्याप्रमाणात सरकारकडून देखील अनुदान वाढविण्याची मागणी पशुपालकांची होती. सरकारने या दरात दुपटीने वाढ केली असून, शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर याबाबतचा शासन आदेश निर्गमित होईल.