esakal | शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! उच्च शिक्षणासह लग्नगाठीही जुळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! लग्नगाठीही जुळल्या

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करताना रोजच्या जगण्याची भ्रांत होती. अशात उच्च शिक्षणाचा विचार करणे तर शक्य नव्हते. पण सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्न तर साकार झालेच; सोबतच आयुष्याचा जोडीदारही मिळाला. ही गोष्ट आहे ती अजित व तेजश्री उबाळे या तरुण दांपत्यांची. (Scholarships-makes-higher education-and-Weddings-also-jpd93)

शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाची वाट सुकर अन्‌ लग्नगाठीही जुळल्या

‘मोहजदेवडे’ पाथर्डी (जि. नगर) येथील अजित व तेजश्री उबाळे राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतून बेंगळुरू येथे दोघे बीएस्सी नर्सिंगची पदवी घेत आहेत. अजित हा तृतीय वर्षात शिकत असून, तेजश्री ही शेवटच्या (चौथ्या) वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या आयुष्यात शिष्यवृत्तीने हा बदल घडविला आहे. अजितची आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते. वडील गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर आहेत. अजितने बारावीपर्यंतचे शिक्षण मजुरी करून घेतले. बारावी विज्ञानमध्ये चांगले गुण असूनही डॉक्टर होण्याचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्याने आयटीआयला प्रवेश घेतला. त्यानंतर पुण्यात दोन वर्षे कंपनीत काम केले; पण मेडिकल क्षेत्रात काम करण्याचे त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने पुन्हा प्रयत्न करत ‘सीईटी’ परीक्षा दिली. मेडिकलला प्रवेश मिळाला नाही; परंतु बेंगळुरूच्या ब्राइट कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला मात्र शैक्षणिक शुल्काचा प्रश्न होता. त्याला सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेची माहिती मिळाली. त्याचा अर्जही मंजूर झाला. २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांसाठी एकूण एक लाख ४३ हजारांची शिष्यवृत्ती मिळाली. साधारण अशीच वाटचाल तेजश्रीचीदेखील आहे. तेजश्रीला २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांची एक लाख ४६ हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षण घेतानाच एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तेजश्री आणि अजित यांची लग्नगाठ जुळली. ४ जुलैला दोघांचा विवाह झाला.

कोरोना रुग्णांची शुश्रूषा

आयुष्यात एका टप्प्यावर उच्च शिक्षण कसे होईल याची भ्रांत होती. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेमुळे आम्हा दोघांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे. ‘शिष्यवृत्तीत शिक्षण घेत असताना आयुष्याचा जोडीदारही मिळाला आहे. हे सर्व शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे शक्य झाले,’ अशी भावना अजित व तेजश्री यांनी व्यक्त केली. दोघांनीही नगरला अनुक्रमे जीवनधारा हॉस्पिटल व तेजश्रीने पटियाला हाउस कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची शुश्रूषा करीत सामाजिक सेवेचा आदर्शही घालून दिला आहे.

हेही वाचा: नाशिकचे जवान अर्जुन वाळूंज आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांवर गुन्हा

हेही वाचा: लग्‍नातील 'त्‍या' व्‍हायरल व्‍हिडीओ मागे अशी होती अशी कहाणी!

loading image