esakal | महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे कोरोना हॉस्पीटलसाठी जागेचा शोध; डॉक्टरांनी उभारली 100 सिलिंडरची बँक

बोलून बातमी शोधा

covid hospital
महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे कोरोना हॉस्पीटलसाठी जागेचा शोध; डॉक्टरांनी उभारली 100 सिलिंडरची बँक
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : शहर आणि जिल्ह्याच्या अर्थकारणात योगदान देणाऱ्या महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे नाशिकमध्ये कोरोना उपचार रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. स्वतःचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांसोबत व्हेन्डर्ससाठी शंभर खाटांचे रुग्णालय कंपनीला सुरू करायचे आहे.

महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे कोरोना रुग्णालयासाठी जागेचा शोध

त्यासाठी आय. एम. ए. च्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बंद पडलेल्या मॉल्सची जागा सुचविली आहे. हे एकीकडे होत असताना शहरातील खासगी डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून शंभर ऑक्सिजन सिलिंडरची बँक सुरू केलीय. त्र्यंबकेश्‍वर नाका भागातील हा मॉल असून, त्याला दोन्ही बाजूने प्रवेश आहे. त्या मुळे ही जागा सोईची होईल. महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे शहरात कोरोना रुग्णालय सुरू होण्याने आरोग्य सेवांमध्ये भर पडण्यास मदत होणार आहे. सद्यःस्थितीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने खासगी रुग्णालयांमधून उपचारासाठी खाटा, ऑक्सिजन खाट, व्हेंटिलेटर मिळणे मुश्‍कील झाले आहे. अशा परिस्थितीत नव्याने शंभर खाटांची सोय होत असल्यास त्यास मदत करायला हवी, अशी भूमिका स्वीकारून आय. एम. ए. च्या पदाधिकाऱ्यांनी महिंद्र ॲन्ड महिंद्रच्या रुग्णालयासाठी जागा शोधण्यात पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: ९३ वर्षांच्या योद्धयाचा कोरोनावर विजय! निराशेच्या वातावरणात सकारात्मकतेची पेरणी

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे खासगी डॉक्टरांनी उभारली शंभर सिलिंडरची बँक

ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिकमध्ये लिक्विड ऑक्सिजनचे दोन टँकर आल्याचा बराच गाजावाजा झाला. मात्र नाशिकसाठी ५० टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार हे आदल्या दिवशी सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात २४ टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाले. हा ऑक्सिजन कुठं गेला? हा प्रश्‍न खासगी डॉक्टर उपस्थित करत आहेत. ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी लिक्विड ऑक्सिजन मिळत नसल्याने हतबल होऊन आता आय. एम. ए. च्या पदाधिकाऱ्यांकडे लिक्विड ऑक्सिजनची मागणी करावी, अशी गळ घालू लागले आहेत. दरम्यान, ऑक्सिजन बँकविषयी सांगताना आय. एम. ए. चे डॉ. समीर चंद्रात्रे म्हणाले, की खासगी रुग्णालयांतून एकेक असे ऑक्सिजन सिलिंडर जमा करण्यात आले आहेत. ऑक्सिजनच्या उपलब्धतेअभावी खासगी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होताच, बँकेतील ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हेही वाचा: पतीच्या देशसेवेचा आदर्श; रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे भावनाताईंचे व्रत

नवीन रुग्णांना दाखल करणे बंद

खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नसल्याने काही रुग्णालयांनी नवीन रुग्णांना दाखल करून घेणे बंद केले आहे. ही स्थिती आजही शहराच्या विविध भागात होती. ऑक्सिजनच्या उपलब्धतेची हमी दिल्याखेरीज रुग्णांना दाखल करून कसे घ्यायचे? असा प्रश्‍न खासगी डॉक्टरांना भेडसावत आहे.