Latest Marathi News | साडेसातशे खासगी ट्रॅव्हल्सला पोलिसांचा दणका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Private travels

Nashik : साडेसातशे खासगी ट्रॅव्हल्सला पोलिसांचा दणका!

नाशिक : नाशिक- औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुली येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकमधील भीषण अपघातात १२ प्रवाशांचा आगीत होरपळून, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर ट्रॅव्हल्स बसचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने, शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला.

पोलिसांच्या या कारवाईमध्ये खासगी ट्रॅव्हल्समध्ये परवानगीपेक्षा जादा प्रवासी आढळलेल्या ७६० ट्रॅव्हल्सला बसला असून, १७ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर एक खासगी ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आली आहे. (Seven half hundred private travels fined by police Nashik Latest Marathi News)

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने शहर पोलिसांनी परजिल्ह्यातून शहरात दाखल होणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करीत खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी गेल्या १४ ऑक्टोबरपासून सुरू केली. महिन्याभरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये पोलिसांनी २ हजार १९३ ट्रॅव्हल्स बसची कसून तपासणी केली. त्यामुळे ७६० ट्रॅव्हल्स चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, या वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई करताना १७ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर, एक ट्रॅव्हल्स बसवर जप्तीची कारवाई करीत ती बस आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी होते नाकाबंदी

पोलिस आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी रोड जकात नाका, पेठ रोड जकात नाका, शिलापूर टोलनाका, शिंदे - पळसे टोलनाका, नववा मैल मुंबई-आग्रा महामार्ग, गौळाणे फाटा या ठिकाणी रात्रीच्या वेळी नाकाबंदी केली जात आहे. प्रत्येक तपासणी नाक्यावर एक पोलिस अधिकारी, २ पुरुष व एक महिला अंमलदार तसेच वाहतूक शाखेकडील दोन अंमलदार व प्रादेशिक परिवहन विभागाकडील एक अधिकारी असे पथक तैनात आहे.

या कारणांवरून कारवाई

क्षमतेपेक्षा जादा वजन, परवानगीपेक्षा अवैधरीत्या जादा प्रवासी वाहतूक करणे, सदोष वाहन चालविणे या प्रमुख कारणांपोटी पोलिस व आरटीओच्या पथकाकडून खासगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. खासगी ट्रॅव्हल्समध्ये एक जादा प्रवासी आढळून आल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, त्याचवेळी परिवहन महामंडळाच्या बसेस या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. या बसवर मात्र कोणतीही कारवाई पोलिस वा आरटीओकडून होत नाही. या दुजाभावामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा: Bakery Products Rates Hike : पावाचे दर 30 टक्क्यांपर्यंत महागले

ट्रॅव्हल्सची तपासणी : २१९३

दंड आकारलेल्या ट्रॅव्हल्स : ७६०

दंडाची वसुल रक्कम : १७ लाख ७९ हजार रुपये

जादा प्रवासी (प्रति प्रवासी) दंड : १२ हजार रुपये

जादा लगेज (विनापरवानगी) दंड : २० हजार रुपये

"सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी वाहतूक नियमांचे पालन होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी क्षमतेपेक्षा वा परवानगीपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई केली आहे. प्रवाशांनीही आपल्या सुखकर प्रवासासाठी नियमांचे पालन करणाऱ्या वाहनातूनच प्रवास करावा."

- पौर्णिमा चौघुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, वाहतूक पोलिस शाखा.

"दररोज चालणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये जादा प्रवासी नसतात. क्वचितप्रसंगी जादा प्रवासी असतात. परंतु, परिवहन महामंडळाच्या बसमध्ये २० पेक्षाही जादा प्रवासी असतात, त्यावर कारवाई होत नाही. खासगी ट्रॅव्हल्सवर दंड आकारला जातो. कायदा समान आहे तर कारवाईही समानच व्हायला पाहिजे. पण तसे होत नाही."

- दिलीपसिंग बेनीवाल, सचिव, नाशिक डेली बस सर्व्हिसेस.

हेही वाचा: Nashik Crime News : घरफोडीची 2 दिवसात उकल; उपनगर पोलिसांची कामगिरी