
मातंग वाड्यातील घरांना आले गटारीचे स्वरूप
जुने नाशिक : राजवाड्यास लागून असलेल्या मातंगवाड्यातील अनेक घरांना गटारीचे स्वरूप आले आहे. महापालिकेच्या (nmc) दुर्लक्षामुळे घरांना लागून असलेली गटर तुंबल्याने गटारीचे पाणी घरात शिरून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. गटारींची दुरुस्ती करून सांडपाण्याच्या समस्येतून मुक्ती द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मातंगवाड्यातील घरांमध्ये गटारीचे पाणी शिरून सांडपाण्याचे तळे साचत आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यास तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे काही महिने झाले, की पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. सध्या गेल्या १० ते १५ दिवसांपासून येथील आठ ते नऊ घरांमध्ये गटारीचे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचत आहे.
राजवाडा परिसरातील सुव्यवस्थित स्थितीत असलेले रस्ते फोडून पुन्हा नवीन रस्ते बांधण्यात आले. त्यापेक्षा मातंगवाड्यातील ड्रेनेजचे काम करणे आवश्यक होते. रस्त्यांच्या कामाबरोबर जमिनीची स्वच्छता आवश्यक होती. तसे न झाल्याने येथील बहुतांश घरांमध्ये सांडपाण्याचे तळे साचले आहे. येत्या पावसाळ्यात यापेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. तत्पूर्वी गटार आणि घरातील सांडपाणी साचण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सांडपाण्यातच संसार करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. चिमुकलेही त्या सांडपाण्यात वावरतात. त्यांच्यासह घरातील अन्य सदस्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. तरीही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. सध्या घरात सर्वत्र सांडपाणी साचले आहे. भविष्यात दुर्घटना होण्यापूर्वी महापालिकेकडून येथील गटारींची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यात यावी. जेणेकरून रहिवाशांना सांडपाण्याच्या समस्येतून मुक्ती मिळेल.
हेही वाचा: रॉकेल मिळेना आणि गॅस परवडेना; सामान्य गृहिणींना बसतोय फटका
"मातंगवाड्याच्या ड्रेनेजच्या समस्येबाबत वेळोवेळी आम्ही तक्रारी केल्या आहेत. तरीही आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. आमचे काही कमी-जास्त झाल्यावर महापालिकेला जाग येईल का? आम्ही माणसे नाही तर जनावरे आहोत का?"
-चेतन बकुरे, रहिवासी
हेही वाचा: नाशिक : सिन्नरकरांना दिवसाआड पाणी
"मातंगवाड्यातील घरात ड्रेनेजचे पाणी शिरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्याचा बेजबाबदारपणा असून, काही विपरीत घडल्यास याला जबाबदार कोण राहणार?"
-ज्ञानेश्वर काळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग
Web Title: Sewage Water In The Houses Of Matang Wada In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..