नाशिक : सिन्नरकरांना दिवसाआड पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

नाशिक : सिन्नरकरांना दिवसाआड पाणी

सिन्नर (जि. नाशिक) : चार-चार दिवसांनी येणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त झालेल्या सिन्नरकरांना रोज पाणी मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाने केलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आले असून, नगर परिषदेने चार दिवसांऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीपुरवठ्याबाबत कुठलीही तक्रार असल्यास सिन्नरकरांनी भाजपच्या कार्यालयात अथवा शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

सिन्नर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली शंभर कोटींची पाणीपुरवठा योजना कडवा धरणावर राबवण्यात आली. ही योजना पूर्ण झाली असतानाही शहराला मुबलक पाणी मिळत नाही. दारणावरील जुनी योजना सुरू असताना सिन्नरकरांना चार दिवसांनी पाणी का येते, असा प्रश्न उपस्थित करत भाजपने मुख्याधिकारी संजय केदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्या वेळी केदार यांनी दोन दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे ५ मेपासून शहरासह उपनगरांमध्ये दिवसाआड ४० मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे भाजपच्या आंदोलनाचे यश आहे. मात्र, यावरच समाधान न मानता शहरवासीयांना रोज मुबलक व पुरेसे पाणी मिळवून देईपर्यंत भाजप शांत बसणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाण्याच्याबाबतीत कुणाचीही काहीही तक्रार असेल, तर त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयात याबाबत तक्रार करावी अथवा शहराध्यक्ष मनोज शिरसाठ, महिला शहराध्यक्षा मंगला झगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. त्यावर मार्ग काढून अडचण दूर करण्याची जबाबदारी भाजपची असेल असेही या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :NashikWater supply