अजान वाजणार नाही, पण साईंची काकड आरती थांबवू नका, मुस्लीम बांधवांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अजान वाजणार नाही, पण साईंची काकड आरती थांबवू नका'

भोंगे बंद केल्याच्या निर्णयाचा फटका शिर्डीमधील काकड आरतीला बसला आहे.

'अजान वाजणार नाही, पण साईंची काकड आरती थांबवू नका'

सध्या महाराष्ट्राचं राजकारण मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. हा समाजिक विषय असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, हा वाद सुरु असताना आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. शिर्डीतील मुस्लीम समुदायाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनंती शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून करण्यात आली आहे. भोंगे बंद केल्याच्या निर्णयाचा फटका शिर्डीमधील काकड आरतीला बसला आहे. मात्र जामा मशीद अध्यक्ष आणि मुस्लिम बांधवांनी आरती सुरू ठेवण्याची विनंती केली आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुवारी पहाटे स्पीकरविनाच काकड आरती संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची मुभा आहे. त्यामुळे आज काकड आरतीच्यावेळी मंदिरात स्पीकर लावण्यात आला नाही. मात्र, या निर्णयामुळे शिर्डीत येणारे साईभक्त नाराज झाले आहेत. दरम्यान, आम्ही सहापूर्वी मशिदीत होणारी अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिर्डीतील मुस्लीम समाजाची विनंती आहे की, भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु करावी. शिर्डीतून राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरु करावी, असे निवेदन जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा: पंतप्रधान म्हणून चांगलं कोण, शरद पवार की उद्धव ठाकरे? खासदार शिंदे म्हणतात...

आज शिर्डीत नेहमीप्रमाणे मंदिराच्या बाहेर काकड आरती ऐकू आली नाही. त्यामुळे मंदिराबाहेर रांगेत असणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील मंदिर आणि मशिदींच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता मुस्लीम समाजाच्या मागणीनंतर शिर्डीच्या मंदिरातील काकड आरतीसाठी विशेष मुभा दिली जाणार का, हे पाहावे लागेल.

दरम्यान, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक देवस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जात होती. पण आज भोंग्याचं निमित्त करून भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने (राज ठाकरे) हिंदूंचा गळा घोटला आहे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली होती.

हेही वाचा: ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही; राजकीय पक्षांची भूमिका

Web Title: Shirdi Sai Baba Temple Kakad Aarti Dont Stop On Loud Speaker Appeal From Muslim Community

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top