esakal | जुन्या-नव्यांच्या ‘सरमिसळ’ने शिवसेनेपुढे आव्हान; राजकारण रंगण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

shiv-sena-12.jpg

वैचारिक मतभेदातून एक-एक करत शिवसेनेचे शिलेदार पक्ष सोडू लागले. गिते व बागूल यांच्या पक्षांतरामुळे संघटना पातळीवर शिवसेना खिळखिळी झाली. गिते यांच्यामुळे शहरात मनसेची ताकद वाढली, तर श्रमिक सेनेच्या बागूल यांच्याकडील कार्यकर्त्यांचे पाठबळ घटले. 

जुन्या-नव्यांच्या ‘सरमिसळ’ने शिवसेनेपुढे आव्हान; राजकारण रंगण्याची शक्यता

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहराच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे वसंत गिते व सुनील बागूल या दोन दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश करून घरवापसी करून घेतल्याने पक्षाची ताकद वाढल्याचे वरकरणी दिसत असले तरी शिवसेनेपुढे अनेक आव्हानेदेखील निर्माण झाली आहे. पडत्या काळात ज्यांनी पक्ष सांभाळला, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन गटातटाचे राजकारण अधिक तीव्र होण्याचीच दाट शक्यता निर्माण होत आहे. 

शहरात मनसेची ताकद वाढली

एकेकाळी काँग्रेसकडून सत्ता हिसकावत नाशिक शहर शिवसेनेने बालकिल्ला बनविला होता. वसंत गिते, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, बबन घोलप यांच्यासारखे कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेल्या पॉवरफुल नेत्यांमुळे शिवसेनेला सुगीचे दिवस पाहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आल्यानंतर शिवसेनेत धुसफूस सुरू झाली. उद्धव यांनी शिवसेनेत नवीन चेहरे देण्यास सुरवात केल्यानंतर शिवसेनेची एकहाती सूत्रे हाती असलेल्यांची पकड सैल होत गेली. वैचारिक मतभेदातून एक-एक करत शिवसेनेचे शिलेदार पक्ष सोडू लागले. गिते व बागूल यांच्या पक्षांतरामुळे संघटना पातळीवर शिवसेना खिळखिळी झाली. गिते यांच्यामुळे शहरात मनसेची ताकद वाढली, तर श्रमिक सेनेच्या बागूल यांच्याकडील कार्यकर्त्यांचे पाठबळ घटले. 

शिवसेनेच्या कार्यालयात अचानक गर्दी ओसरल्याने ओहोटी

कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात अचानक गर्दी ओसरल्याने ओहोटी लागली. त्या काळात शिवसेनेने नवनेतृत्वाला साद घालत अनेकांचे पक्षप्रवेश करून घेतले, तर इतरांमुळे ज्यांचे नेतृत्व बुजत होते त्यांनादेखील शिवसेनेत उभारी मिळाली. मनसेला गळती लागल्यानंतर अनेकांचे शिवसेना प्रवेश झाले व ते निवडूनदेखील आले. दहा-बारा वर्षांच्या पडत्या काळात शिवसेना संघटना पातळीवर उभी राहिली असताना पक्षातून गेलेल्या गिते-बागूल यांची घरवापसी झाली. जुन्या नेत्यांचे पक्षप्रवेश झाल्याने पडत्या काळात पक्ष सांभाळलेल्या नेत्यांमधील नाराजीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संजय राऊत यांनाही या नाराजीची कल्पना आहे. त्यामुळेच दोघांना पक्षप्रवेश देताना शिवसेनेच्या व्यासपीठावर सर्वच जण एकदिलाने, प्रेमाने बसल्याचे त्यांना सांगावे लागले. 

नाराजीचा बाँब फुटण्याची भीती 

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली असून, त्याअनुषंगाने भाजप संघटना खिळखिळे करण्याचे काम शिवसेनेकडून सुरू आहे. एकीकडे पक्षात दिग्गज नेते घेताना एकाच म्यानात अनेक तलवारी राहू शकणार नाहीत. यामुळे भाजप खिळखिळी करताना शिवसेनतच नाराजीचा बाँब फुटण्याची शक्यता आहे. 

जुनी लॉबी सक्रिय 

शिवसेनेचे बदलते स्वरूप लक्षात न आल्याने अनेकांना साइड ट्रॅक व्हावे लागले. त्यामुळे पक्षात पुन्हा नव्याने स्थान निर्माण करायचे असेल, तर गिते-बागूल यांना परत आणण्यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले. फोटोसेशनवेळी गायब झालेले अनेक चेहरे अवतरल्याचे शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसून आले. यामुळे शिवसेनेत पुन्हा जुनी लॉबी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

हे ठरणार वादाचे मुद्दे

- महापालिका निवडणुकीची सूत्रे कोणाकडे? 

- द्वारका भागात माजी महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्याऐवजी प्रथमेश गितेंना उमेदवारी 
- नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या प्रभागात अजय बागूल यांची निवडणूक लढण्याची तयारी 
- उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्यासमोर माजी नगरसेविका मनीषा हेकरे यांची उमेदवारी 
- गिते, बागूल समर्थकांना महापालिका निवडणुकीतील तिकीटवाटप  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार


 

loading image