esakal | ''चमकोगिरी करणाऱ्या भाजपने समाजसेवा शिकवू नये'',शिवसेना, राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार!

बोलून बातमी शोधा

political logo
''चमकोगिरी करणाऱ्या भाजपने समाजसेवा शिकवू नये'',शिवसेना, राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार!
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाची साथ (corona virus) आल्यापासून शिवसैनिक जिवाचे रान करून कोरोनाबाधित व योद्ध्यांना मदत करत आहेत. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट असो की ऑक्सिजन बॅंकेची निर्मिती, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, (remdesivir injection) रक्तपुरवठा गरजूंना केला जात आहे; परंतु सत्ताधारी भाजप फक्त चमकोगिरी करण्यात मग्न आहे. कामे तर जमत नाहीत मात्र इतरांना सल्ले देण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे चमकोगिरी करणाऱ्या भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला (shivsena NCP) समाजसेवा शिकवू नये, असा शाब्दिक हल्लाबोल केला. (Shiv Sena NCP criticized BJP)

हेही वाचा: चंद्रकांत पाटीलांच्या 'त्या' वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

चमकोगिरी करणाऱ्या भाजपने समाजसेवा शिकवू नये

संयुक्त पत्रकात म्हटले, की नाशिकमध्ये कोरोना संसर्गामुळे हजारो बळी गेले. गेल्या अडीच महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने बाधित आढळून येत आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड तर कधी रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी नाशिककर विनवण्या करत आहेत. एवढे होऊनही सत्ताधारी भाजपला जाग आली नाही. दत्तक नाशिक घेतलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या शब्दाची शिवसेनेकडून आठवण करून दिली जात असेल तर भाजपला एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण नाही. शब्दाला जागले पाहिजे, एवढेच आमचे म्हणणे आहे. कोरोनामुळे शहर बेजार झाले असताना भाजपवर टीकेची झोड उठली. त्यानंतर श्री. फडणवीस यांना नाइलाजाने नाशिकला यावे लागले. नाशिककरांच्या मनात सत्ताधारी भाजपबाबत काय मत आहे, हे बिटको रुग्णालयात लोकांच्या संतापातून दिसून आले. त्यामुळेच फडणवीस यांना माघारी फिरावे लागले. कोरोना महामारीत कुठलीही चमकोगिरी न करता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुविधा पुरवत आहेत. हा गुण फडणवीस यांनी घेतला तरी त्यांचे राजकारण सार्थकी लागेल.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

...तर रस्त्यांवर फिरू देणार नाही

शहरात कोविड सेंटर उभारणे, रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविणे, रक्तदान, प्लाझ्मादान हे फक्त शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना विनामूल्य जेवण शिवसेनेतर्फे दिले जात आहे. रस्त्यांवर फक्त शिवसेनेच्या रुग्णवाहिका दिसत आहेत. त्याला कारण म्हणजे जनतेशी जुळलेली नाळ. त्यामुळे समाजसेवा म्हणजेच शिवसेना हे लोकांना माहीत आहे. शिवसैनिक भाजपप्रमाणे स्टंटबाजी करत नाहीत. त्यामुळे कारण नसताना डिवचू नये, अन्यथा भाजप नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.

सोनवणे, पाटील यांचा अभ्यास कच्चा

सभागृहनेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील यांचा अभ्यास कच्चा आहे. महाविकास आघाडी सरकारने महापालिकेला आतापर्यंत १८.६५ कोटी रुपयांचा निधी कोविडसाठी दिला आहे. याउलट भाजपच्या नगरसेवकांनी वेतन राज्याकडे जमा न करता पंतप्रधान निधीत जमा केले, त्यामुळे राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्याचा नैतिक अधिकार कधीच गमावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री सातत्याने बैठका घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत, याचे भान दोन्ही नेत्यांनी ठेवताना पदाची गरिमा टिकवत नाशिककरांशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.(Shiv Sena NCP criticized BJP)