Nashik News : नाशिक रोडला पाण्याचा ठणठणाट; ऑक्टोबरमध्येच 8 ते 10 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा

Water Shortage
Water Shortageesakal

Nashik News : यंदा अपुरा पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार हे खरे असले तरी ती वेळ अधिकृत पावसाळा संपल्यानंतर अवघ्या सहा- सात दिवसातच आली.

नाशिक रोड भागात तब्बल आठ ते दहा दशलक्ष लिटर पाण्याचा दररोजचा तुटवडा निर्माण झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी आयुक्तांची भेट घेऊन टंचाई मिटविण्याची मागणी केल्यानंतर दारणा धरणात तराफा टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

‘अल निनो’ वादळामुळे यंदा पुरेसा पाऊस पडला नाही. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसामुळे दारणा व गंगापूर धरणात पुरेसे पाणी साठले आहे. (Shortage of 8 to 10 million liters of water in nashik road news)

मात्र मराठवाड्यातील धरण परिसरात अपुरा पाऊस झाल्याने वरच्या म्हणजेच गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे खालच्या धरणांमध्ये पाणी सोडण्याची शक्यता व त्यातून नाशिक शहरांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती असतानाच ती स्थिती ऑक्टोबरमध्येच जाणवू लागले आहे.

१५ ऑक्टोबरला अधिकृत पावसाळा संपल्याची घोषणा केली जाते. या दिवसापासूनच नाशिक रोड भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मागील आठ दिवसांपासून जवळपास आठ ते दहा दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा होत आहे. नाशिक रोड भागाची पाण्याची गरज प्रतिदिन ८२ ते ८४ दशलक्ष लिटर आहे. यातील २४ दशलक्ष लिटर पाणी गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून घेतले जाते, तर उर्वरित ५८ ते ६० दशलक्ष लिटर पाणी दारणा धरणातून उचलले जाते.

सद्यःस्थितीत दारणा धरणातून आवर्तन बंद झाल्याने आठ ते दहा दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. त्याशिवाय जे पाणी उपलब्ध होते, त्याला दुर्गंधी येत असल्याने नाशिक रोड भागात विभागनिहाय कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार ढिकले व माजी नगरसेवक मोरूस्कर यांनी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या यांत्रिकी व वितरण विभागातील असमन्वय दूर करण्याची मागणी केली.

तराफा टाकून पाणीपुरवठ्याच्या सूचना

नवरात्रोत्सवात नागरिकांची अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मोठे गैरसोय झाली. दिवाळीत असाच पाणीपुरवठा राहिल्यास असंतोष निर्माण होईल. अधिकाऱ्यांच्या संदर्भात तक्रारी करूनही कारवाई होत नाही. रोटेशन बंद झाल्यानंतर चेहेडी बंधाऱ्यातील पाणी दूषित होते व पाणीपुरवठ्यासाठी गांधीनगर येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर वर्षानुवर्षे अवलंबून राहावे लागते.

Water Shortage
NMC News : डॉक्टरांची महापालिकेच्या सेवेकडे पाठ; वैद्यकीय विभागाची कसरत

त्यामुळे गांधीनगर ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुरू असलेल्या पाइपलाइनचे काम तातडीने सुरू करण्याबरोबरच दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून शिर्डी पंपिंगच्या वरच्या बाजूला जवळपास ५०० मीटर तराफा टाकून पाणी उचलावे, अशी मागणी करण्यात आली. आयुक्तांनी तातडीने तराफा टाकून नाशिक रोड भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.

पाणीपुरवठ्यासाठी सूचना

- गांधीनगर येथील दीड दशलक्ष लीटर क्षमेतेचा सम्प कार्यान्वित करावा

- शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी चेहेडी बंधाऱ्याच्या वर तराफा टाकून पाणी उचलावे

- गांधीनगर ते नाशिक रोड रॉ वॉटर लाइनचे काम तातडीने पूर्ण करावे

- यांत्रिकी व वितरण विभागातील समन्वय साधण्याची जबाबदारी निश्चित करावी

"अमृत दोन’ योजनेतून दारणा धरणातून नाशिक रोडसाठी थेट पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होऊन योजना अमलात येईपर्यंत दारणा धरणातून पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा प्रशासनाने करावा व गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापासून शंभर एमएलडी क्षमतेची पाइपलाइनचे काम तातडीने हाती घ्यावे." - ॲड. राहुल ढिकले, आमदार पूर्व.

''यांत्रिकी व वितरण विभागाच्या असमान्वयांमुळे नाशिक रोड भागात नवरात्रीपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवाळीतही अशीच स्थिती राहिल्यास असंतोष निर्माण होईल. नाशिक रोडचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिकेकडे पर्याय सुचविले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी.'' - संभाजी मोरुस्कर, माजी नगरसेवक.

Water Shortage
Nashik Vegetable Rate Hike : मेथीच्या जुडीला सोन्याचे मोल; गृहिणींचे बजेट कोसळण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com