`ऐनवेळी‘ रासायनिक खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची धावाधाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fertilizers

`ऐनवेळी‘ रासायनिक खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची धावाधाव

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : रब्बी हंगामाला सुरूवात झाली असून निफाड तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांना प्राधान्य देत आहेत. बहुसंख्य शिवारात या पिकांचा पेरा सर्वाधिक दिसून येत आहे. परंतु पिकांना उभारी घेण्यासाठी नत्र, पालाश, स्फुरद अशा विविध रायायनिक घटकांचा समावेश असलेल्या खतांची गरज असताना ऐनवेळी त्यांचा तुटवडा जाणवत आहे. कृषि विभागाने याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे.

खतांअभावी उत्पादनात घट

सध्या पिकांना आवश्‍यक असलेल्या रासायनिक खतांमध्ये डिएपी, युरिया तसेच १०-२६-२६ या खतांना सर्वाधिक मागणी आहे. परंतु सध्या तालुक्यातील एकाही कृषी निविष्ठा विक्रेत्याकडे ही खते उपलब्ध नाहीत. खतांअभावी उत्पादनात घट येईल, या विचाराने शेतकरी हतबल झाला आहे. रासायनिक खतांची रॅक अद्याप लागली नसल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे कृषी साहित्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र ऐन हंगामाच्याच तोंडावर खतांचा तुटवडा कसा निर्माण होता याकडे कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांची गैरसोय थांबवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा: आम्हीच रात्रभर का जागायचे? शेतकऱ्यांचा महावितरणला सवाल

''सध्या शेतकऱ्यांकडून डिएपी खताची जोरदार मागणी होत आहे. परंतु रॅक न लागल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी एकाच खतांवर अवलंबून न राहता उपल्बध असलेल्या खतांमधून मिश्र खते घ्यावी. आवश्‍यक घटकांची पुर्तता करावी.'' - बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.

''शेती हंगामानुसार बि-बियाणे, औषधे व रासायनिक खते उपलब्ध करून देणे शासनाचीच जबाबदारी आहे. कोणतेही कारण नसताना ऐनवेळी रॅक लागली नाही, म्हणून खतांचा तुटवडा आहे असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. शासनाकडून नियोजित पध्दतीने शेतीचे खच्चीकरण करण्यात येत आहे, त्याचाच हा पुरावा आहे.'' - बाबासाहेब शिंदे, माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

हेही वाचा: अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

loading image
go to top