esakal | नाशिक शहरात 'कोव्हिशिल्ड'चा तुटवडा; २७ हजार कोव्हॅक्सिनचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

covishild

नाशिक शहरात 'कोव्हिशिल्ड'चा तुटवडा; २७ हजार कोव्हॅक्सिनचे लसीकरण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाला विरोध करणाऱ्या कोव्हिशिल्ड लसींचे दोन लाख डोस नागरिकांना देण्यात आले, तर कोव्हॅक्सिनचे २७ हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहे. खासगी लसीकरण केंद्रांत अल्प प्रतिसाद मिळत असल्याची बाब समोर आली आहे. मोफत लस घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोव्हिशिल्डचे अवघे दोन हजार ६४२ डोस शिल्लक असून, दोन दिवसांत त्याचा तुटवडा निर्माण होणार आहे.

बारा हजार ७०६ डोस शिल्लक

महापालिकेतर्फे आरोग्य केंद्रांत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लसीकरणासाठी महापालिकेच्या २६ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, तर २४ केंद्रे खासगी आहेत. महापालिकेला कोव्हिशिल्डचे दोन लाख तीन हजार ८५० डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी दोन लाख एक हजार २०८ डोस टोचण्यात आले. सध्या दोन हजार ६४२ डोस शिल्लक आहेत. हेल्थ वर्करसाठी पहिला व दुसरा २९ हजार ८२८, फ्रंटलाइन वर्कर १४ हजार १६, ४५ ते ६० वयोगटासाठी ४७ हजार ५५२, ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ४२ हजार ७११, तर खासगी लसीकरण केंद्रात ६७ हजार १०१ डोस देण्यात आले. कोव्हॅक्सिनचे ३६ हजार ७६० डोस प्राप्त झाले होते. त्यातील दहा हजार ६४ डोस महापालिकेकडे शिल्लक आहेत. कोव्हॅक्सिनचे हेल्थ वर्करला एक हजार २९९, फ्रंटलाइन वर्करसाठी ७१६, ४५ ते ६० वयोगटासाठी एक हजार ९२८ तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना पाच हजार ६९७ डोस देण्यात आले. खासगी लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिनचे १७ हजार २४ डोस देण्यात आले. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनचे मिळून दोन लाख ४० हजार ६१० डोस प्राप्त झाले होते. त्यातील दोन लाख २७ हजार ९०४ डोस देण्यात आले असून, बारा हजार ७०६ डोस शिल्लक आहे.

हेही वाचा: लग्नाचा बार उडाला पण संपूर्ण वऱ्हाडी मंडळी संकटात!

लसीकरण बंद पडण्याची शक्यता

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोफत लस उपलब्ध असल्याने लसीकरणासाठी गर्दी आहे. त्यातही कोव्हिशिल्डला अधिक मागणी आहे. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनला अल्प मागणी आहे. कोव्हिशिल्डचे अवघे दोन हजार ६४२ डोस शिल्लक असल्याने येत्या दोन दिवसांनंतर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरणच्या मान्यतेसाठी २२ अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा: सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा