VIDEO : तुम्हीच सांगा, जगायचं कसं?पोट भरण्यासाठी थोडा वेळ तरी व्यवसाय करू द्या... 

panchvati market.jpg
panchvati market.jpg

नाशिक / पंचवटी : कोरोनाच्या संचारबंदीमुळे व्यवहार ठप्प पडल्याने किरकोळ व्यवसाय करून हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत एकवेळ जगण्याची भ्रांत असलेल्या या व्यावसायिकांनी "तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसं? प्रशासनाने सकाळ व सायंकाळी थोडा वेळ तरी व्यवसायाची परवानगी द्यावी, अशी आर्त विनवणी आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 21 मार्चपासून देशात संचारबंदी सुरू आहे. यात सगळेच व्यवसाय ठप्प पडल्याने रोजचा व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्याची उपासमार सुरू आहे. पोलिसांसह महापालिका यंत्रणा रस्त्यावर व्यवसाय करण्यास मनाई करत असल्याने अनेकांची गत "आई जेवू घालेना व बाप भिक्षा मागू देईना' अशी झाली आहे. नाशिकला गंगाघाटावर भाजी विक्रीद्वारे उपजीविका करणाऱ्यांची संख्या काही हजारांत आहे. संचारबंदीत जगणेच अवघड झालेल्या काही व्यावसायिकांच्या व्यथा त्यांच्याच शब्दांत... 


जगायचं कसं! हीच चिंता 
गेल्या 20 वर्षांपासून गंगाघाटावर भाजी विक्रीचा व्यवसाय करून स्वतःसह कुटुंबीयांचा चरितार्थ चालवितो. सिंहस्थ कुंभमेळ्याला भाजीबाजार उठविल्यापासून गंगाघाटावरील किरकोळ भाजी विक्रेत्यांवर बेकारीची संक्रांत आली आहे. त्यामुळे सध्या भाजी बाजार टाळून रामसेतूशेजारी व्यवसाय करतो. घरात आई-वडिलांसह पत्नी व मुलेही आहेत, त्यामुळे प्रापंचिक गरजा पूर्ण होण्यासाठी उठल्यापासून झोपेपर्यंत पैशांची निकड भासते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे तीन आठवड्यांपासून व्यवसाय ठप्प आहे. पोलिसांसह महापालिका यंत्रणा रस्त्यावर बसू देत नाही. दुसरीकडे घरात भाजीपाला ठेवू शकत नाही, कारण नाशवंत माल असल्याने दोन दिवसांत भाजीपाला खराब झाल्यामुळे टाकून द्यावा लागतो. आता व्यवसायच नसल्याने भांडवल संपले आहे. त्याता आता आणखी 15 दिवस संचारबंदी वाढल्याने कसं जगायचं, हा प्रश्‍न उभा ठाकला आहे, त्यातच घरातील मुलांचे शिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीत जगावे कसे, असा प्रश्‍न पडला आहे. -मंगेश सोनवणे, भाजी विक्रेते 

(व्हिडिओ - सोमनाथ कोकरे/केशव मते)
 

पोट भरण्यासाठी व्यवसाय बदलला 
गेल्या अनेक वर्षांपासून रामसेतूवर होजिअरी विक्रीचा व्यवसाय करतो. घरी आई-वडिलांसह पत्नी व शाळेत जाणारी मुले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी महापालिकेसह पोलिस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यवसायास बंदी केली. त्यामुळे कुटुंबीयांसह उपासमारीची वेळ आली. जगावे कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला असता काही मित्रांच्या सल्ल्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु बदललेल्या परिस्थितीत आता भाजी विक्रेत्यांसाठी विशिष्ट वेळ देण्यात आल्याने जगावे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोटासाठी व्यवसायच बदलला, परंतु आता भाजीपाला विक्रीचीही वेळ ठरवून दिल्याने जगणेच अवघड बनले आहे. प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना सकाळ व सायंकाळ अशी दोन वेळा परवानगी दिल्यास गृहिणींसह व्यावसायिकांचेही पोट भरण्यासही हातभार लागू शकतो. -सुनील भावसार, भाजीविक्रेते 

(व्हिडिओ - सोमनाथ कोकरे/केशव मते)

थोडा वेळ व्यवसाय करू द्यावा 
शहर-जिल्ह्यात 10 हजार सलून व्यावसायिक आहेत. एकेका दुकानावर दोन कारागीर व स्वतः मालक अशा तिघांचे कुटुंब म्हणजे साधारण 30 हजार जण अवलंबून आहेत. प्रत्येकाच्या मागे चार जणांचे कुटुंब असून, ही संख्या लाखांच्या पुढे जाते. जवळपास 90 टक्के व्यावसायिक भाड्याच्या जागेत व्यवसाय करतात. दिवसभरात जे मिळेल, त्यावर व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. पण तीन आठवड्यांपासून दुकानेही बंद असल्याने मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सलून व्यावसायिकांना सकाळ व सायंकाळी थोडा व्यवसाय करू द्यावा. माझ्यामागे वृद्ध आईसह शिक्षण घेणारी दोन अपत्ये असल्याने त्यांच्या फीसह घरखर्च चालवू कसा, असा प्रश्‍न पडला आहे. दुकान बंद असले तरी घरखर्च सुरू आहे. ओळखीच्या ग्राहकांना घरी बोलावून जगण्याची धडपड सुरू आहे. शासनाने सलून व्यावसायिकांची परिस्थिती जाणत त्यांना आर्थिक सहाय्य करावे. - संतोष वाघ, शहराध्यक्ष नाभिक महासंघ 

वेळेबाबत संभ्रमावस्था 
दूध, ब्रेड, भाजीपाला यांसारख्या नाशवंत वस्तूंच्या वितरणात सुसूत्रता नसल्यास एकाच वेळी ग्राहकांची अडचण आणि वितरकांचे नुकसान होते. त्यामुळे त्यांच्या वेळेबाबत सुसूत्रता हवी. बंदोबस्तावरील लोकांना नियमाविषयी माहिती दिली जावी. एवढी माफक अपेक्षा आहे. तसेच अत्यावश्‍यक सेवा 24 तास सुरू राहिल्या तर गर्दी होणार नाही. जर त्या ठराविक वेळेपुरत्या सुरू राहिल्या तर सहाजिकच लोक तेवढ्या वेळात गर्दी करणार, सध्या तसेच होते आहे. सध्या वृत्तपत्र बंद आहे. त्यामुळे शासनाचे आदेश काय आहेत, दुकानांच्या वेळा काय हे सगळ्यांपर्यंत पोचत नाही. त्यात, नाशवंत व अत्यावश्‍यक सेवांची दुकानदार व ग्राहकांची कोंडी सुरू आहे. सुरक्षित अंतर राखणे हा मूळ संचारबंदीमागचा हेतू आहे. तो साधला जाणे महत्त्वाचे आहे. मात्र सध्या ठराविक वेळ दुकान सुरू ठेवण्याने गर्दी वाढून गैरसोय जास्त आहे. प्रशासनाने आतापर्यंत अतिशय व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळली आहे. त्यात अधिक सुसूत्रता येण्यासाठी वेळांबाबत संभ्रम दूर व्हावा. -मिलिंद जहागीरदार, जहागीरदार बेकर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com