बारा बलुतेदारांनी उंचावली सोनजची मान! Inspirational News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonaj

बारा बलुतेदारांनी उंचावली सोनजची मान! Inspirational News

सोनज (जि. नाशिक) : येथील गाव व परिसरातील बारा बलुतेदारांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव रोषण केले आहे. नाशिक जिल्ह्यासह खानदेशमध्ये गेल्या पाच दशकापासून सोनज हे गाव उच्च शिक्षित म्हणून परिचित आहे.

विविध क्षेत्रात तरूण-तरूणींची यशाला गवसणी

गावात साडेतीनशेपेक्षा अधिक शिक्षक, सीमेचे रक्षण करणारे जवान व पोलिस दलातील जवानांची संख्या सव्वाशेपेक्षा अधिक आहे. गेल्या दशकभरापासून पोलिस व सैनिकांचे गाव म्हणून देखील नावारुपास आले आहे. राज्य व राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक तरुण, तरुणींनी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. गावातील ८० टक्के कुटुंबिय बच्छाव आडनावाचे असल्याने गावाला ‘बच्छावांचे सोनज’ म्हणून देखील ओळखले जाते.

हेही वाचा: नोटांचा पाऊस! चित्रपटात नव्हे, हे प्रत्यक्षात घडलंय; लुटणाऱ्यांच्या मागे लागले पोलिस

गावालगत सोनज्या डोंगर आहे. या डोंगरावर सोनजाई देवीचे मंदिर आहे. देवीच्या नावारुन गावाला सोनज नाव पडले. गावात बहुसंख्य कुणबी मराठा समाजासोबतच माळी, धनगर, बौद्ध, चांभार, न्हावी, पारधी, कुंभार, मांग, गारुडी, तेली, ब्राम्हण, मारवाडी आदी समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. सर्वच जातीतील तरुण, नागरीक, महिला उच्चशिक्षित व नोकरदार आहेत. माजीमंत्री शोभा बच्छाव, आयकर उपायुक्त जीवन बच्छाव, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मनीषा पवार, पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत बच्छाव, आरबीआयचे अधिकारी पंकज बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संग्राम बच्छाव, गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, मंत्रालयात कार्यरत असलेले शांताराम घोंगडे, मंत्रालयात अधिकारी असलेल्या गायत्री खैरनार, मुंबई येथे वकिली व्यवसायात सक्रिय असलेले विनोद सोनजकर, भाजपच्या ईशान्य मुंबई महिला अध्यक्षा योजना ठोकळे, संजय आहिरे, शिक्षक पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप बोरसे, विलास बोरसे, सिन्नरच्या गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धनराज मोरे, प्रा. दिलीप मोरे, व्यावसायिक बापू चौधरी आदिंचा समावेश आहे. याशिवाय असंख्य नागरीक डॉक्टर, इंजिनियर, शासकीय अधिकारी, नोकरदार, ग्रामसेवक, खासगी व्यावसायिक, बँक अधिकारी, खेळाडू, पोलीस आदी क्षेत्रात कार्यरत आहेत.


गावाशी जोडली नाळ

येथील नागरीक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असले तरी त्यांची गावाशी नाळ जोडली आहे. गावात संपर्क ठेवून असल्याने तरुणांना वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळत असते. यामुळेच येथील तरुणांचा आत्मविश्‍वास उंचावतो. परिणामी, उच्च शिक्षण व नोकरीतील संधीत सोनजचे तरुण बाजी मारतात. एकूणच गावाच्या बारा बलुतेदारांनी राज्य व देशभरात गावाची शान वाढविली आहे.

हेही वाचा: World Television Day: जाणून घ्या दूरदर्शन दिनाचा इतिहास, महत्व

''घराघरात शिक्षणाची बीजे रोवली गेल्याने येथील नागरिक शासकीय, खासगी क्षेत्रात गावाचा नावलौकिक वाढवित आहेत. त्यात सर्वच जाती धर्माच्या नागरिकांचा समावेश आहे. सर्वांनी मिळून गावाचे नाव उज्वल होण्यास हातभार लावला आहे.'' - तानाजी घोंगडे, गटशिक्षणाधिकारी

''गावातील तरुण सर्वच आघाड्यांवर कार्यरत आहेत. मिळालेले शिक्षण आणि संस्कार याचेच द्योतक आहे. यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळत आहे. आगामी काळातदेखील गावाचा लौकिक टिकून राहील.'' - जीवन बच्छाव, आयकर उपायुक्त, पुणे

loading image
go to top