VIDEO : सटाण्यात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद; विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलीसांचा दंडुक्याचा प्रसाद! 

satana & baglan.jpg
satana & baglan.jpg

सटाणा (जि. नाशिक) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला आज शनिवार (ता.१०) पासून सटाणा शहर व बागलाण तालुकावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे. शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सक्रिय रूग्णांच्या आकडेवारीने दोन हजारांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहर व तालुक्यातील सर्व दुकाने बाजारपेठा काल शुक्रवार (ता.९) रोजी रात्री आठपासून कडकडीत बंद करण्यात आली आहेत. या बंदमुळे आज सकाळपासून रस्त्यांवर शुकशुकाट आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या आठवणी आता ताज्या!

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी शहरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद आहेत. किराणा माल, भाजीपाला विक्री, हॉटेल्सनाही टाळे लागले आहे. वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना शहरात प्रवेश दिला जात नाही. 

पोलीस कारवाईच्‍या भीतीमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.

गर्दी होण्याची प्रमुख ठिकाणे असलेल्या अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजीपाला विक्री, हॉटेल्सही प्रशासनाने दोन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून फक्त पेट्रोल पंप,  मेडिकल, दवाखाने आणि दुधाची दुकाने सुरू आहेत. एसटीची सेवा सुरू ठेवण्‍यास परवानगी असली तरी प्रवाशांअभावी बसेस आगारातच उभ्‍या आहेत. तर लांब पल्‍ल्‍याच्‍या अन्‍य जिल्‍हयातून काल आलेल्‍या बसेस परत जाताना रस्त्यावर दिसत आहेत. लॉकडाउनमुळे लोकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले तर अनेकांनी पोलीस कारवाईच्‍या भीतीमुळे घरातच राहणे पसंत केले. सरकारी कार्यालयांना सुटी असल्‍याने रस्‍त्‍यावर तुरळक वर्दळ होती.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी...

बागलाण तालुक्यात अधिकृतरित्या सध्या ११४२ सक्रिय रुग्ण असले तरी ग्रामीण व शहरी भागातील कोविडची लक्षणे असलेले अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात कोणत्याही तपासण्या न करता तात्पुरते उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण मेडिकल दुकानातून तात्पुरत्या गोळ्या औषधे घेऊन घरीच उपचार घेत असल्याने ते इतर कुटुंबियांनाही बाधित करत असल्याचे दिसून आले आहे. हे रुग्ण दररोज शहरातील विविध दुकाने, भाजीबाजार, कार्यालये, बँका, एसटी बसेस आदि ठिकाणी बिनधास्तपणे फिरून कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे कडक निर्बंध असतांनाही तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहर व तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांच्याकडे कोविड लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची नावे व पत्त्यांसह सविस्तर माहिती दररोज प्रशासनाकडे देणे गरजेचे आहे. मात्र काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून असे होताना दिसून येत नाही. प्रशासनानेही खुलेआम फिरणार्‍या बाधितांसह कोरोनाची लक्षणे असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे राज्य शासनाने विकेंड लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. दोन दिवसाच्या टाळेबंदीत नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण फिरणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोरोनाची लक्षणं असलेल्यांनी सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि अफवांना बळी न पडता तत्काळ वैद्यकीय तपासण्या करून विलगीकरणात राहावे. 
- नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक, सटाणा पोलिस ठाणे

सटाणा शहरात पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल गवई, देवेंद्र शिंदे, किरणा पाटील यांनी विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com