esakal | लालपरीची चाके पुन्हा थांबली! येवल्यात ४६ बस उभ्या, २२० कर्मचारी बसून

बोलून बातमी शोधा

ST buses have been shut down again due to lockdown
लालपरीची चाके पुन्हा थांबली! येवल्यात ४६ बस उभ्या, २२० कर्मचारी बसून
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : कोरोनाने भल्याभल्या व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. याला एसटीही अपवाद नसून पुन्हा एकदा एसटीची चाके आर्थिक टंचाईत फसायला सुरवात झाली आहे. लॉकडाउन, वाढलेली रुग्णसंख्या व नागरिक घराबाहेर निघत नसल्याने पुन्हा एकदा एसटीची चाके ठप्प झाली आहेत.

लालपरी लॉकडाउनच्या संकटात

कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षी बंद असलेली एसटीची वाहतूक सुरळीत होतेन्‌ होते तोच पुन्हा संक्रात आली आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद होती. याचा फटका येवला एसटी आगारालाही बसला होता. त्यानंतर आता पुन्हा सुरू असलेल्या लॉकडाउनपूर्वी रोज सरासरी तीन लाख रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळत होते. लॉकडाउनची घोषणा होताच आगाराचे उत्पन्न केवळ पंधरा हजारावर आले आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे ग्रामस्थांना सुमारे एक वर्षापासून दर्शनसुद्धा दुर्लभ झाले आहे. गावोगावची लालपरीची वाहतूक बंद असल्याने त्याचा दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. शाळा, महाविद्यालये तर बंद आहेतच. परंतु, शेतकऱ्यांना बाजार समितीत अथवा किरकोळ भाजीपाला, शेतीची उत्पादने विकण्यासाठी शहरात येण्याचा एकमेव आधार असणारी लालपरी लॉकडाउनच्या संकटात सापडली आहे.

हेही वाचा: शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं

लाट ओसरण्याची वाट पाहावी लागणार…

येवला एसटी आगाराच्या ४६ बस रोज पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, कळवण, मालेगाव, मनमाड, नगर अशा दूरवर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस आता आगारात उभ्या आहेत. आगारात ९६ चालक असून, ८१ वाहक आहेत. तर २३ चालक कम वाहक आहेत. वर्कशॉपसह सुमारे २२० कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शासनाने लॉकडाउनच्या नवीन नियमांची घोषणा केली असून, २३ एप्रिलपासून एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. सामान्य नागरिकांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक प्रवास असल्यास तशी कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. दरदिवशी तीन ते पाच लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या बस आगारात स्थितप्रज्ञपणे उभ्या असणार आहेत. आगाराचे सुमारे २०० वाहक-चालक रोज आपल्याला सोपवलेल्या मार्गावर एसटी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घरी बसण्याची वेळ आली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवासी वाहतूक करत असलेली एसटी रस्त्यावर येईल, असा विश्‍वास प्रवाशांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही आहे. पण, पुन्हा त्यासाठी कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई

२३ एप्रिलपासून १ मेपर्यंत एसटी सेवा फक्त अत्यावश्यक प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्यावश्यक काळात प्रवास करायचा असल्यास तशी कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. प्रवाशांनी मास्क लावणे तसेच एसटी महामंडळाच्या नियमांचे पालन करणे सक्तीचे असणार आहे. अर्थात, प्रवासीच नसल्याने एसटी रस्त्यावर धावताना दिसत नसून यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

- प्रशांत गुंड, आगारप्रमुख, येवला