esakal | खासदारांची सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन गेली कुठे? भाजपचा शिवसेनेवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

खासदारांची सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन गेली कुठे? भाजपचा शिवसेनेवर निशाणा

खासदारांची सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन गेली कुठे? भाजपचा शिवसेनेवर निशाणा

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नाशिकला येताना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणले असते तर बरे झाले असते या टीकेला उत्तर देताना भाजपने थेट खासदार हेमंत गोडसे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. खासदार गोडसे यांनी जाहीर केलेली सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करीत भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे.

शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नाशिकसाठी आठवड्यातून एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. शिवसेनेने दत्तक पिता अवतरल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांनी मुंबईहून येताना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणली असती तर बरे झाले असते, अशी टीका केली होती. त्यावर रविवारी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याने कोरोना महामारी रोखण्यास अपयशी ठरले.

हेही वाचा: नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट

सरकारमधील नेते तसेच नाशिकचे पालकमंत्री अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकार व महापालिकेस जबाबदार ठरवीत आहेत. पालकमंत्र्यांनी स्वत: सात हजार रेमडेसिव्हिर येतील, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र, ती आली कुठे, गेली कुठे हे त्यांनाच ठाऊक. नाशिक भाजपतर्फे मुंबईत एफडीआय सचिवांची भेट घेऊन ठिय्या आंदोलन केले. त्याचे फलित म्हणून नाशिकसाठी दोन हजार रेमडेसिव्हिर व १०० टन ऑक्सिजनची पूर्तता होईल, असे लेखी स्वरूपात देण्यात आले. विशेष म्हणजे ३० एप्रिलला दोन हजार १५७ रेमडेसिव्हिर प्राप्त झाली. फडणवीस यांनी आठवड्याला नाशिकसाठी दोन टँकर जामनगरवरून मिळवून देणार असल्याचे जाहीर केले. कंपनीनेदेखील ऑक्सिजन पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. याउलट राज्य सरकारने जे प्रयत्न करायला हवे होते ते दिसलेच नाहीत.

खासदार गोडसे खोटारडे

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी सात हजार रेमडेसिव्हिर शहरासाठी आणली व १०० टन ऑक्सिजन नाशिकसाठी मंजूर केल्याची ढोलकी वाजवली. मात्र रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन नेमका गेला कुठे, असा सवाल करताना यातून नाकर्तेपणा व खोटारडेपणा दिसत असल्याची टीका केली. बिटको हॉस्पिटलमध्ये फडणवीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असता यांच्यावर विरोधकांनी भाडोत्री लोकांमार्फत अत्यंत खालच्या स्तराला जाऊन अर्वाच्य भाषेत टीका केली. जनतेच्या अडचणी सोडविणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करण्यात जास्त रस दाखविला आहे.

"भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने खासदार गोडसे यांनी घोषित केलेली सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन व १०० टन ऑक्सिजनचे काय झाले, याचे उत्तर द्यावे, नंतरच बोलावे."

- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप

loading image