
चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा अवघ्या 24 तासांत लावला शोध
येवला (जि. नाशिक) : ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’, असं म्हटले जाते. याचा प्रत्यय राजापूर येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते व येवला शहर पोलिसांनी दिला आहे. शहरातून चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर शोधण्यासाठी जिल्ह्यासह औरंगाबाद व नगर जिल्ह्याचा शंभरावर किलोमीटर परिसर पिंजून काढला. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले अन् २४ तासांच्या आत ट्रॅक्टर शोधण्यात यश आले. त्यामुळे ट्रॅक्टरमालक शेतकऱ्याला हायसे वाटले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या चोरीच्या संदेशाची देखील ही चोरी पकडण्यासाठी मदत मिळाली आहे. (stolen tractor searched in just 24 hours Nashik News)
राजापूर येथील शेतकरी संजय रघुनाथ वाघ यांचा ट्रॅक्टर शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विक्रीसाठी (Onion Sales) आला होता. कांदा विक्री झाल्यानंतर एका पेट्रोलपंपावर (Petrol Pump) उभा होता. चालक ट्रॅक्टर पेट्रोलपंपावर उभा करून व्यापाऱ्याकडे पावती करण्यासाठी गेला होता. पावती घेऊन आल्यानंतर पंपावर ट्रॅक्टर नसल्याने शेतकऱ्याची धांदल उडाली व ट्रॅक्टर चोरी गेल्याचे लक्षात आले. चोरट्याने ट्रॅक्टर चोरून नेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा: उद्धव ठाकरेंच बोलणं, न उगवलेल्या बियाण्यासारखंच! : सदाभाऊ खोत
याबाबत वाघ यांनी पोलिसांत तक्रार दिली, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून राजापूर येथील प्रत्येकाचे स्टेटस व सोशल मीडियावर चोरीची माहिती सर्वत्र व्हायरल केली. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी राजापूर येथील सरपंच दत्ता सानप, माजी सरपंच सुभाष वाघ, आशपाक सय्यद आदींनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन चोरीची माहिती दिली होती. या वेळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी आम्हाला थोडा वेळ द्या, नक्कीच ट्रॅक्टरचा शोध लावू, असे आश्वासन दिले होते.
हेही वाचा: बोहाडा उत्सवात विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळांनी नाचवले मुखवटे
त्यानुसार त्यांनी सर्वत्र माहिती पाठवत चोरीबाबत कळविले होते. आज सकाळी पुन्हा पोलिस निरीक्षक मथुरे यांच्याशी स्थानिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधत ट्रॅक्टरचा शोध लावण्याची विनंती केली. त्यानुसार मथुरे यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेत शोधासाठी पथके रवाना केले. उपनिरीक्षक सूरज मेढे व गणेश पवार, सतीश बागूल, मुकुंद गांगुर्डे आदींच्या पथकाने भरउन्हात थेट नगर, औरंगाबाद जिल्ह्याचा परिसर पिंजून काढला. राजापूर येथील दत्ता सानप, सुभाष वाघ, अशापक सय्यद, कृष्णा कव्हात, अण्णासाहेब मुंडे, भाऊसाहेब भाबड, अनिल अलगट, समाधान चव्हाण, दत्तू वाघ, नवनाथ वाघ, शरद वाघ, संतोष घुले, काशीनाथ चव्हाण, बाळू वाघ आदी ग्रामस्थ देखील शोधमोहिमेत सहभागी झाले होते. याचदरम्यान ट्रॅक्टर सापडल्याने राजापूरकरानी शहर पोलिसांचे आभार मानले आहे.
चोरट्याने मुंबई-नागपूर हायवेवर वैजापूर (जि. औरंगाबाद)पासून १७ किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर दहेगाव शिवारात बेवारस स्थितीत सोडून निघून गेला होता. शोधमोहिमेत दहेगाव शिवारात ट्रॅक्टर व ट्रॉली आढळून आल्याने शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान टळले असून, चेहऱ्यावर ट्रॅक्टर सापडल्याचे कळताच हसू उमटले. वाघ यांनी सोशल मीडियावर (Social Media) स्टेटस, व्हॉट्सॲप (Whatsapp), फेसबुकवर (FB) चोरीचा संदेश व्हायरल केलेल्याचे तसेच शोधमोहीम राबविणाऱ्या पोलिसांचे देखील आभार मानले आहे.
Web Title: Stolen Tractor Searched In Just 24 Hours Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..