Latest Marathi News | सातपूर भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; चिमुकल्याला चावा घेत फरफटत नेले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Patil, city vice-president of BHAJYUMO, while giving a statement to the additional commissioner of the demand that the stray dogs in Satpur area should be taken care of.

Nashik : सातपूर भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; चिमुकल्याला चावा घेत फरफटत नेले

नाशिक : सातपूर श्रमिकनगर येथील एका लहान मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेऊन फरफटत नेल्याचा प्रकार घडला. सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी जखमी मुलावर उपचार करून महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले. प्रशासकीय राजवटीत ठेकेदारांच्या मुजोरपणाचा नागरिकांना फटका बसत असल्याचा आरोप या वेळी पाटील यांनी केला. (Stray dogs roaming in Satpur area Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : जाखोरीत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद!

सातपूर, गंगापूर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. इतर जनावरांसह रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांवर भटके कुत्रे हल्ला करतात. आतापर्यंत हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झाले आहेत. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. भटक्या कुत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांची मुजोरी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरात अन्यत्र भटकी कुत्री पकडतात, नंतर सातपूरच्या जंगली भागात सोडून देतात. कुत्रे पुन्हा नागरी वसाहतीकडे येतात. या भटक्या कुत्र्यांमुळे या भागात बिबट्याचाही वावर वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर सातपूर भागात पेस्ट कंट्रोल व औषध फवारणी होत नसल्याने दुर्गंधी पसरली असून, डेंगी आजाराने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच नियमीत औषध व धूर फवारणी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.

हेही वाचा: Nashik Road Traffic : वाहतुकीचा प्रश्न ठरतोय डोकेदुखी; पोलिसांचे दुर्लक्ष

टॅग्स :NashikattackStray Dogs