Nashik News : अपुऱ्या बससेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची परवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

Nashik News : अपुऱ्या बससेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची परवड

वणी : कोरोना आणि परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपामुळे ग्रामीण भागातील एसटी बसची सेवा संपूर्णपणे विस्कळित झाली होती. सद्यःस्थितीत आता ही सेवा सुरळीत असताना देखील दिंडोरी तालुक्यातील बससेवा ही सुरळीत नसल्याने येथील ग्रामस्थ, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रचंड परवड होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे तालुक्यातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी येथील विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी केली आहे.

हेही वाचा: India’s First Double-Decker Bus: एका तरूणाच्या उपोषणामूळे केरळमध्ये आली पहिली बस; महाराजच होते पहिले प्रवासी!

दिंडोरी तालुक्यातील करंजवण,लखमापूर,ओझे, पिंपरखेड, खेडले, म्हेळुस्के, कादवा माळुगी या गावामधील बससेवा पूर्वीच्या वेळापत्रका प्रमाणे सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थिनींना दिंडोरीसह नाशिकला जाण्यासाठी बस आहे. मात्र हीच बस परत येण्यासाठी नसल्याने विद्यार्थीच मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा, कॉलेज, आयटीआय, स्पर्धा परीक्षा वर्ग तसेच विविध कोर्ससाठी बाहेर जातात. मात्र या अपुऱ्या बससेवेमुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खेळ खंडोबा होत आहे. अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ आलेली आहे.

हेही वाचा: Nashik ST Bus Accident: ब्रेक फेल झालेल्या एसटीच्या धडकेचा थरार CCTV कॅमेऱ्यात

तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या मुक्कामी बस सोडली तर दिवसभर बस येत नाही. आज ही ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करणाऱ्या जनतेचे प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे लालपरीच आहे. बस सेवेचा टपाल सेवेवरही परिणाम झाला आहे. नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने दिंडोरी तालुक्यातील एसटी बससेवा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार चालू करण्याची मागणी विद्यार्थी व प्रवासी वर्गाकडून वारंवार केली जात आहे .

हेही वाचा: Citylinc Bus Service : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बससेवेचे नव्याने नियोजन; जाणुन घ्या

''ग्रामीण भागातील अनेक गावातील बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. शाळा, कॉलेज मधील विद्यार्थिनी घरी येण्यास सांयकाळी उशिर होत असतो. अनेक गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ असल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या वेळापत्रक प्रमाणे बस सेवा चालू करण्यात यावी.''

- तानाजी बर्डे, ओझे