Nashik News : पुरेशा सुविधा मिळत नसल्याने चापडगाव आश्रम शाळेचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students

Nashik News : पुरेशा सुविधा मिळत नसल्याने चापडगाव आश्रम शाळेचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर!

सिन्नर (जि. नाशिक) : आदिवासी विभागाच्या अखत्यारितील संत तुकाराम महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चापडगाव ता. सिन्नर या शाळेचे विद्यार्थी आश्रम शाळेतील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत.

रात्रीच्या वेळी मुला मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळी नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. आश्रम शाळा प्रशासनाचा निषेध करत हे विद्यार्थी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर शिक्षकांनी धावत पळत येत या विद्यार्थ्यांची मनधरणी करून पुन्हा शाळेत नेले. (Students of Chapadgaon sant tukaram Ashram School protest on streets due to not getting enough facilities Nashik News)

पुरेशा सुविधा मिळत नसल्याने चापडगाव आश्रम शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाकडे मोर्चा घेऊन जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी रोखले.

यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक सोपान पालवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैर सुविधांबाबत तोडगा काढण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे संस्था स्तरावर निवारण करण्यात येईल असे सांगितले.

सदर आश्रम शाळेत 436 मुले व मुली निवासी शिक्षण घेत आहेत. पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग या आश्रम शाळेत असून दीडशे मुली आहेत. या मुलींच्या वसतिगृहासाठी गेल्या तीन वर्षांपासून महिला अधीक्षिका नाही. संस्थेने त्यापूर्वी कार्यरत अधीक्षकेला निलंबित केल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

परिणामी कंत्राटी पद्धतीने महिला अधिक्षक पदाची जबाबदारी घ्यायला कुणी तयार होत नाही. शाळेतील शिक्षिका आळीपाळीने एक दिवस मुक्कामी थांबून मुलींची काळजी घेतात. असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Nashik News : Hybrid Annuity रस्त्याचे काम थंडावले; कौळाणे- नांदगाव- येवला मार्गावरून खडतर प्रवास!

या आहेत आश्रम शाळेतील असुविधा

- वस्तीगृहातील राहण्याची गैरसोय.

- मुलींच्या वस्तीगृहासाठी महिला अधीक्षिका नसल्याने होणारी अडचण.

- निकृष्ठ जेवणाचा दर्जा.

- शिक्षकांकडून मुलींना स्वयंपाक करायला सांगणे.

- शिपायाकडून मुलांना शाळेचा परिसर झाडायला सांगणे.

- क्रीडा व संगणक शिक्षणाची परवड.

- आंघोळीला गरम पाणी न मिळणे.

हेही वाचा: Nashik ZP News : जिल्हा परिषदेला प्राप्त आदिवासी उपयोजनेचे 71 कोटी पडून