Success Story | जिद्द : पाणीपुरीच्या चवीने केली संघर्षावर मात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayashreetai Garud

Success Story | जिद्द : 'ती'च्या पाणीपुरीच्या चवीने केली संघर्षावर मात!

संकटं मुळातच आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतात. मात्र संकटांना संधी मानून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिनं बदलला. रोजीरोटीच्या लढाईनं नाशिकमध्ये बिऱ्हाड थाटलं... चौकात पाल टाकून तब्बल दहा वर्षे झोपडीत काढली...

घरोघरी स्वयंपाकाची कामे करतानाच तुटपुंज्या भांडवलावर परप्रांतीयांची मक्तेदारी असा शिक्का असलेल्या पाणीपुरी व्यवसायाला कष्टाची जोड देत संघर्षाची लढाई जिंकत चाकरमान्यांचं आयुष्य जगणाऱ्या गरुड कुटुंबाला उभं केलं, त्या नाशिकच्या इंदिरानगर येथील जयश्रीताई गरुड यांनी...। (Success Story Courage jayashree Garud Overcome struggle with taste of Panipuri nashik news)

जयश्री दिलीप गरुड यांचं शिक्षण जेमतेम अकरावी... माहेर पारनेर तालुक्यातील भगूर गोरेगाव येथील... वडील लक्ष्मण रणदिवे व आई सुमनबाई यांच्या रणदिवे परिवारातील जयश्रीताई या एकुलत्या कन्या.

तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या परिवारात अचानक आलेल्या कौटुंबिक संकटांमुळे जयश्रीताई यांचा सांभाळ आईच्या माहेरच्या मंडळींनी केला. जयश्रीताई यांना लहानचं मोठं करताना मिळेल ते काम करत आईने काबाडकष्ट केले. मात्र परिस्थितीमुळे जयश्रीताईंचे शिक्षण अर्ध्यावरच सुटलं.

जयश्रीताई यांचा विवाह नगर जिल्ह्यातील भगूर येथील दिलीप मारुती गरुड यांच्याशी २००२ मध्ये झाला. दिलीप गरुड यांचंही शिक्षण जेमतेम... मात्र दोन वेळच्या कुटुंबाच्या जगण्याच्या धडपडीत कुटुंब नाशिकमध्ये स्थिरावलं होतं.

नवीन नाशिकच्या इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीजवळच्या मोकळ्या भूखंडावर पाल वजा झोपडी टाकून कुटुंबाचा संसार सुरू होता. पती दिलीप हे सेल्समन केक. विक्रीचे काम करत होते. सासरे एका बांधकामाच्या साइटवर वॉचमन म्हणून कामाला जात होते. कुटुंबाला आधार म्हणून जयश्रीताई यांनीही जबाबदारी घेतली.

परिसरातील घरांमध्ये स्वयंपाकापासून ते साफसफाई करण्याची कामं त्या करू लागल्या. कुटुंबातील वाढत्या जबाबदाऱ्या पेलवताना भाग्यश्री, धनश्री आणि वेदश्री या तीन मुलींच्या निमित्ताने कुटुंब संख्या वाढली.

तुटपुंज्या भांडवलातून उभ्या राहिल्या जयश्रीताई

घरोघरी जाऊन काम करण्यातून प्रगती शक्य नसल्याने स्वतःच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याबाबतची कल्पना पती दिलीप गरुड यांना बोलून दाखवली. जयश्रीताई यांची कुटुंबासाठीची धडपड पाहून नेहमीच पती दिलीप यांनी त्यांना पाठबळ दिले.

इंदिरानगर येथील रोजच्या धकाधकीच्या आयुष्याची गरज ओळखून भेळभत्ता विक्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय जयश्रीताईंनी घेतला. यासाठी स्वतःसह पती दिलीप यांनीही पाच हजार रुपये भांडवल उपलब्ध करून दिले. २००८ मध्ये रस्त्याच्या कडेला बसून जयश्रीताई यांनी भेळभत्ता विक्री सुरू केली.

व्यवसायात स्थिरावत असतानाच नागरिकांच्या मागणीवरून त्यांना भेळभत्ता विक्रीला पाणीपुरीची जोड दिली आणि कुटुंबाचा राजमार्ग मोकळा झाला. परिसरात त्यांनी तयार केलेल्या पाणीपुरीला अल्पावधीच लोकप्रियता मिळाल्याने जय गजानन भेळ सेंटरने कुटुंबाला भक्कम आधार मिळाला.

जयश्रीताई यांचा पाणीपुरी व्यवसायातून पसारा वाढत असल्याचे लक्षात येताच पती दिलीप यांनीही सेल्समनची नोकरी सोडून देत पतीला मदत करत राहिले. पाणीपुरी व्यवसायातून कुटुंबासाठी आधार होत असतानाच स्वतःला शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागलेल्या जयश्रीताई यांनी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे. मुलींनी नोकरी करत असतानाच स्वतःचा व्यवसायही उभा करावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

महिलांनी पुढे यावे

अतिशय कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या पाणीपुरी व्यवसायात महिलांनी नक्की पुढे यावे, असे आवाहनही त्या करतात.

जगण्याच्या धडपडीत नाशिकमध्ये सुमारे दहा वर्षे रस्त्यावर झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देतानाच आज स्वतःच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये स्थिरावताना इंदिरानगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. दीपीकाताई जगताप, पती दिलीप गरुड,ज्योती कोलते यांच्यासह गरुड परिवाराने दिलेल्या

प्रोत्साहनामुळे पाणीपुरी व्यवसायातून स्वतः उभे राहतानाच परप्रांतीय नागरिकांनी सुरू केलेला व्यवसाय असा शिक्का पुसत या व्यवसायात जयश्रीताई यांनी स्वतःची उभी केलेली ओळख नक्कीच महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.