Success Story : चांदोरीच्या कांचनची गगन भरारी; गावातील पहिली Sales Tax Inspector | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanchan Tarley with family

Success Story : चांदोरीच्या कांचनची गगन भरारी; गावातील पहिली Sales Tax Inspector

चांदोरी (जि. नाशिक) : मुली मोठ्या झाल्या की बापाचं नाव मोठं करतात, असं म्हटलं जात. हे करून दाखवलं आहे निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील टर्ले कुटुंबात जन्मलेल्या कांचनने. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खडतर अशा परीक्षांना सामोरे जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडते तर काहींना यश मिळते. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावच्या एका मुलीने देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. (Success Story Kanchan Gagan Bharari of Chandori first Sales Tax Inspector in village Nashik news)

या मुलीने फक्त परीक्षाच पास केली नाही तर गावात पहिली कर निरीक्षक म्हणून बहुमान ही पटकवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या २०२१ च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात चांदोरी येथील श्री हिरामण व सौ निर्मला या दांपत्याची कन्या असलेल्या कांचन टर्ले हिने घवघवीत यश मिळवले आहे. शेतकरी असून हिरामण टर्ले यांची शिक्षणावर अढळ श्रद्धा आहे. मोठा मुलगा निखिल मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याची स्वतः ची ‘निर्मलाहिरा’ नावाची सोलर उपकरणाची स्टार्ट अप आहे. तर लहान मुलगी अश्विनी हिने नुकतीच सीएची अंतिम परीक्षा दिली आहे.

वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कांचन टर्लेची कहाणी प्रेरणादायी आहे. एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसटीआय परीक्षेचा निकाल लागला. यात तिला २६८.५ मार्क मिळाले असून मुलींच्या खुल्या संवर्गातून तिची निवड झाली आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सुरवातीपासूनच शिक्षणात हुशार कांचनचे प्राथमिक तिने चांदोरी गावातील भैरवनाथ नगर जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षक रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले. बारावीचे शिक्षण तिने नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात पूर्ण केले. पुढे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील स. प. महाविद्यालयात अर्थशास्र विषयात पूर्ण केले. शिक्षणासोबत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. या पूर्वी दोनदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली असून त्यात अपयश आले. परंतु, खचून न जाता तयारी सुरू ठेवली. अभ्यास चालू ठेवत ती राज्यसेवा २०२१ आणि राज्य कर निरीक्षक २०२१ पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली. यानंतर मुख्य परीक्षेसाठी काही काळ रजा घेऊन अभ्यास केला व पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य कर निरीक्षक पदावर निवडली गेली. सध्या ती मालेगाव तालुक्यातील मळगाव येथे तलाठी या पदावर कार्यरत आहे. तिच्या यशात भाऊ निखिल, वहिनी गौरी आणि बहीण अश्विनी यांचा मोलाचा वाटा आहे.

"अभ्यासात सातत्य, स्वयंशिस्त त्याला मेहनतीची जोड आणि जवळच्या व्यक्तींची साथ असेल तर यश नक्की मिळते. मोठी स्वप्न उराशी बाळगण्याचे साहस मला वडिलांनी दिले. आणि त्यात आईने साथ देत सहकाऱ्यांच्या मदतीने एक पाऊल पुढे टाकता आले. यश मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे, परंतु, हे यश स्पर्धा परिक्षेच्या प्रवासातील स्वल्पविराम असून अजून प्रवास बाकी आहे." -कांचन टर्ले

टॅग्स :Nashik