Success Story : निफाडच्या अनुष्का गोसावीची आयआयटी खरगपूरसाठी झाली निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Kharagpur

Success Story : निफाडच्या अनुष्का गोसावीची आयआयटी खरगपूरसाठी झाली निवड

निफाड (जि. नाशिक) : येथील वैनतेय विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेल्या अनुष्का अनिल गोसावी हिची खरगपूर येथे गुणवत्तेच्या आधारावर आयआयटीसाठी (केमिकल) निवड झाली आहे.

निफाडसारख्या ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या तोडक्या शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून तिने यशाला गवसणी घातली आहे. अभ्यासात सातत्य, नियमित सराव व मनाची सकारात्मकता ठेवल्याने यश मिळाल्याचे तिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (Success Story Anushka Gosavi of Niphad got selected for IIT Kharagpur nashik news)

अनुष्काला शिक्षणाची प्रेरणा आपल्या कुटुंबातूनच मिळाली. वडील अनिल गोसावी मविप्रच्या माध्यमिक शाळेत गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत तर आई कल्पना गोसावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे.

आजोबा रामचंद्र गोसावी शिक्षक असल्याने सुरवातीपासूनच घरात शैक्षणिक वातावरण होते. कुटुंबात मावशी व बहीण दोघीही वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्चशिक्षित आहेत, त्यांचेदेखील सदैव मार्गदर्शन मिळाले.

वडिलांचा अध्यापनाचा विषय गणित असल्याने बालपणापासूनच गणिताची विशेष आवड निर्माण झाली. गणितातील विविध संबोध स्पष्ट होताना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करावे असं वाटायला लागलं आणि ध्येयाच्या मार्गाने प्रवास सुरू झाल्याचे तिने सांगितले.

ध्येयनिश्चिती म्हणजे यशाकडे पोचण्याचा निम्मा रस्ता मार्गक्रमण झालेला असतो. अशाच प्रकारे ध्येयाच्या मार्गाने प्रवास करताना एसएससी परीक्षेत तिने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

अकरावी विज्ञान शाखेत नाशिक येथे प्रवेश घेत बारावीला ९५ टक्के गुण मिळविले. कुशल तज्ज्ञ मार्गदर्शक, उत्तम अभ्यासपद्धती असलेल्या नाशिकमधील खासगी क्लासला तिने प्रवेश घेतला होता. क्लासचे सर्वेसर्वा संग्राम यादव व विश्वास जैन यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

2021 च्या जेईई मुख्य परीक्षेला तब्बल दहा लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील दीड लाख विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले होते.

"अभियांत्रिकी क्षेत्रात अतिशय नावाजलेल्या क्लासच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून आणि शैक्षणिक अनुभवातील विविध क्लृप्त्या व सराव संच यांचा उपयोग करून, नियमित मूल्यमापनातून ध्येयापर्यंत पोहचणे शक्य झाले. जिद्द, गुणवत्ता आणि चिकाटीच्या जोरावर नक्कीच आपले ध्येय साकार होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील ध्येयाकडे योग्य दिशेने मार्गक्रमण करावे व आपले ध्येय साध्य करावे." - अनुष्का, निफाड.

टॅग्स :NashikIIT