
Success Story : धावपटू दुर्गा प्रशासकीय सेवेत; राज्यसेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश
नाशिक : धावण्याच्या शर्यतीत सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकविणारी आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे ही प्रशासकीय सेवेत दाखल होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या गुणवत्ता यादीत दुर्गाच्या नावाचा समावेश असून, तिला उपजिल्हाधिकारीपद मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे दुर्गाने पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यशस्वी कामगिरी केली आहे. (Success Story Runner Durga in administrative service Passed civil services exam in first attempt nashik news)
मुळची नाशिकची असलेली दुर्गा हिने विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होताना पदकांची लयलूट केलेली आहे. साधारणतः दीड वर्षांपूर्वीपासून तिने स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरवात केली. नाशिकलाच अभ्यासिका व शिकवणी लावताना तिने अभ्यास सुरू ठेवला.
या दरम्यान अगदी राज्यसेवा परीक्षेपासून विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेतून पात्रता मिळविताना वेगवेगळ्या पदांसाठीच्या मुख्य परीक्षांना ती सामोरे गेली होती. यापैकी नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या गुणवत्ता यादीत दुर्गाने स्थान पटकावले आहे.
तिने ओबीसी प्रवर्गातून व क्रीडा कोट्यातून समावेश करण्यात आलेला आहे. दुर्गाने कॉलेज रोडवरील एचपीटी व आरवायके महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले आहे.
रोजचा नऊ तास सराव
खेळाडूंचा जास्तीत जास्त वेळ मैदानावर जात असतो. त्यामुळे खेळाडूंना एकाच ठिकाणी बसण्याची फारशी सवय नसते. परंतु अभ्यासात सातत्य राखताना दुर्गाने दैनंदिन नऊतासांपर्यंत अभ्यास सुरु ठेवला. दरम्यान अभ्यास सुरु असताना फिटनेसकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खबरदारी तिने घेतली.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
धावण्याच्या शर्यतीत चार आंतरराष्ट्रीय पदके
आजवर दुर्गाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत ती स्पर्धांमध्ये सहभागी झाली. एशियन ज्युनिअर गेम्समध्ये कांस्यपदक पटकावण्यासह साऊथ एशियन ज्युनिअर गेम्समध्ये वेळेचा विक्रम नोंदविला आहे.
वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये सहभाग, युथ कॉमनवेल्थमध्ये तिने पाचवे स्थान राखले होते. २०१९ मध्ये इटली येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये दहावे स्थान राखले. आजवर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चार पदके पटकावण्यासह राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीसहून अधिक पदके तिने जिंकलेली आहेत.
"स्वयंप्रेरणेने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी घेतलेल्या परिश्रमांचे चीज झालेले असून, अंतिम निवड जाहीर होण्याची प्रतीक्षा करते आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत देशा, राज्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न असेल."
- दुर्गा देवरे, आंतरराष्ट्रीय धावपटू.